नाशिक : रामकुंडावर अस्वच्छतेचा कळस ; समितीने पाहणी करण्याची मागणी | पुढारी

नाशिक : रामकुंडावर अस्वच्छतेचा कळस ; समितीने पाहणी करण्याची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; भाविकांसह पर्यटकांचे श्रद्धेचे स्थान असलेल्या गोदावरी नदीवरील प्रमुख ठिकाण असलेल्या रामकुंड परिसरातही अस्वच्छतेचा कळस झाला असून, महापालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने त्यात दिवसागणिक भरच पडत होत आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या सदस्यांसह पाहणी करण्याची मागणी याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राजेश पंडित यांनी 2012 मध्ये गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबत जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने विविध उपाययोजना करून प्रदूषणमुक्त नदी करण्याचे आदेश महापालिका, जलसंपदा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलिस खाते यासह संबंधित विभागांना दिले आहेत. असे असताना गेल्या बारा वर्षांत संबंधित यंत्रणांना उपाययोजना करून गोदावरी नदीचे प्रदूषण कमी करण्यात यश मिळू शकलेले नाही. गोदावरी नदीत सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीत कारखान्यांसह इतरही प्रकारचे सांडपाणी मिसळत असल्याने प्रदूषणात दिवसेंदिवस वाढत होताना दिसत आहे. सोमेश्वर ते दसक पंचक या महापालिका हद्दीतील गोदावरी नदीच्या पात्रात सर्वत्र पाणवेलींचे आच्छादन निर्माण झाले आहे.

यामुळे गोदावरी नदीचे पात्रच दिसून येत नसल्याने गोदावरी नदी लुप्त झाली की काय, अशी शंका यावी. आता तर रामकुंड हे भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान असलेल्या रामकुंड परिसरातही अस्वच्छता मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्याने भाविकांना स्नान करणेही अवघड झाले आहे.

हेही वाचा :

Back to top button