शरद पवार : ‘ईडीचा गैरवापर वाढला, देशासमोर गंभीर प्रश्न’ | पुढारी

शरद पवार : 'ईडीचा गैरवापर वाढला, देशासमोर गंभीर प्रश्न'

बारामती; पुढारी वृत्तसेवा : ईडीसारख्या केंद्रीय सस्थांचा गैरवापर वाढला आहे. हा सध्या देशासमोर महत्त्वाचा प्रश्न आहे. ईडीच्या कारवाईची आकडेवारी समोर आली ती स्पष्ट सांगते की हा कार्यक्रम कोणाला तरी राजकीय हेतूने त्रास देण्यासाठी हाती घेतला आहे. स्पष्ट सांगायचं म्हणजे गेल्या पाच वर्षात इथं असलेल्या कुणालाही ही संस्था माहीत नव्हती. पण, आता ईडी गावागावात पोहोचलीय, असे मत खासदार शरद पवार यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

उसाची एफआरपी दोन टप्प्यात देण्याच्या निर्णयासंबधी पवार म्हणाले, उसाची एफआरपी एकरकमी द्यायला हरकत नाही. पण, ती कर्ज काढून द्यावी लागेल. कर्ज कोणी काढायचं तर साखर कारखान्यांनी. कारखान्याचे मालक शेतकरी सभासदच आहेत. त्यामुळे त्यांच्यावरच कर्जाचा बोजा वाढेल. त्यामुळे थोडा व्यवहार्य विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांना पैसे दिलेच पाहिजेत, वेळेवर दिले पाहिजे. पण शक्यतो कर्ज काढून देऊ नका असं मला वाटतं, असेही खा. पवार म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या पुष्पक ग्रुपची ६ कोटी ४५ लाखांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ठाण्यामधील निलांबरी प्रोजेक्टमधील ११ फ्लॅट्स ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ईडीने धडक कारवाई सुरु केली आहे. केंद्राच्या इशाऱ्यावरून ही कारवाई होत असल्याचा आरोप सातत्याने महाविकास आघाडी सरकारकडून होत आहे. मात्र ईडीकडून कारवाईचा धडाका सुरुच आहे.

या कारवाईनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये आणखी संघर्ष चिघळण्याची चिन्हे आहेत. या कारवाईमुळे ईडीने ठाकरे कुटूंबही चौकशीच्या फेऱ्यात आल्याचे बोलले जात आहे. ईडीकडून २०१७ मध्ये पुष्पक बुलियन्स विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वीही ईडीकडून २१ कोटींची मालमप्ता जप्तीची कारवाई झाली आहे.

ईडीच्या छापेमारीवरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी ईडीबाबत महत्त्वाची प्रतिक्रीया दिली. या प्रकरणी राजकीय सुडबुद्धीने कारवाई करून कोणतीही बाजू मांडू न देता कारवाई करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी केला. तुम्हाला झुकवू शकतो हे दाखवून देण्यासाठी अशा कारवाया होत असल्याचा आरोप केला. केंद्रिय तपास यंत्रणांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नमवू शकतो अशा प्रकारे भाजपचे काम सुरू आहे. देशात ज्या ठिकाणी भाजप पराभूत झाला आहे त्या सर्वठिकाणी अशा कारवाया सुरू आहे. असे राऊत म्हणाले.

Back to top button