सीएम उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी यांच्या बंधूंची ईडीकडून ६ कोटी ४५ लाखांची संपत्ती जप्त | पुढारी

सीएम उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी यांच्या बंधूंची ईडीकडून ६ कोटी ४५ लाखांची संपत्ती जप्त

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या पुष्पक ग्रुपची ६ कोटी ४५ लाखांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ठाण्यामधील निलांबरी प्रोजेक्टमधील ११ फ्लॅट्स ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ईडीने धडक कारवाई सुरु केली आहे. केंद्राच्या इशाऱ्यावरून ही कारवाई होत असल्याचा आरोप सातत्याने महाविकास आघाडी सरकारकडून होत आहे. मात्र ईडीकडून कारवाईचा धडाका सुरुच आहे.

दरम्यान, या कारवाईनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये आणखी संघर्ष चिघळण्याची चिन्हे आहेत. या कारवाईमुळे ईडीने ठाकरे कुटूंबही चौकशीच्या फेऱ्यात आल्याचे बोलले जात आहे. ईडीकडून २०१७ मध्ये पुष्पक बुलियन्स विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वीही ईडीकडून २१ कोटींची मालमप्ता जप्तीची कारवाई झाली आहे.

ईडीची कुर्ल्यात छापेमारी

राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर अटकेच्या कारवाईनंतर आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी (ता.२२) सकाळपासून कुर्ला परिसरात छापेमारी केली. ईडी अधिकाऱ्यांसह सीआरपीएफचे जवानही कुर्ल्यात दाखल झाले आहेत. कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंडसह अन्य ठिकाणी ही छापेमारी सुरु असल्याची माहिती मिळते.

कुर्ल्यातील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील तीन एकर जागेत पसरलेल्या गोवावाला कंपाउंड जमिन खरेदी-विक्रीच्या गैरव्यवहारामुळे नवाब मलिक हे सध्या तुरुंगात आहेत. ईडीच्या छापेमारीमुळे मलिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईडीकडून जागेची पाहणी केली जात असून काही कागदपत्रे आढळून येतात का त्याची तपासणी केली जात आहे.

प्राप्तीकर खात्याची सुद्धा मुंबईसह २४ ठिकाणी छापेमारी

प्राप्तीकर खात्याकडून मुंबईतील हिरानंदनी समूहाच्या मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले आहेत. करचुकवेगिरी प्रकरणात ही छापेमारी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. हिरानंदनी समूहाच्या मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईतील एकूण 24 मालमत्तांवर छापेमारी सुरु करण्यात आल्याची माहिती मिळते. प्राप्तीकर खात्याच्या कारवाईने बांधकाम क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button