पुणे : वडगावमध्ये रंगला दगडी गुंडी उचलण्याचा अनोखा मर्दानी खेळ | पुढारी

पुणे : वडगावमध्ये रंगला दगडी गुंडी उचलण्याचा अनोखा मर्दानी खेळ

वडगाव मावळ ; पुढारी वृत्तसेवा : धुलीवंदनाच्या निमित्ताने येथे दरवर्षी होणारा दगडी गुंडी उचलण्याचा पारंपरिक शिवकालीन अनोखा खेळ दोन वर्षांच्या विलंबानंतर मोठ्या उत्साहाने पार पडला. दरम्यान या अनोख्या खेळात सौरभ नामदेव ढोरे याने दगडी गुंडी खांद्यावर घेऊन तब्बल २२२ बैठका मारून नवा विक्रम केला.

ग्रामदैवत श्री. पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात झालेल्या या खेळाचा शुभारंभ हभप तुषार महाराज दळवी, देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, गणेशअप्पा ढोरे, बाबुराव वायकर, भास्करराव म्हाळसकर, नगराध्यक्ष मयुर ढोरे, सुनील चव्हाण, मंगेशराव ढोरे, बिहारीलाल दुबे, रवींद्र यादव, बापूसाहेब वाघवले यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

या खेळामध्ये सौरभ ढोरे याने सुमारे ८५ किलो वजन असलेली दगडी गुंडी घेऊन तब्बल २२२ बैठका मारून सन २०२० मध्ये नितीन म्हाळसकर यांनी केलेला १८० बैठकांचा विक्रम मोडून नवा विक्रम प्रस्थापित केला. तसेच सुरेंद्र भिलारे याने १६० बैठका मारून दुसरा तर अभिजित दिसले याने ५१ बैठका मारून तिसरा क्रमांक पटकावला.

या खेळात रोशन ढोरे याने ३० बैठका, केदार धोंगडे याने १० व महेंद्र सुर्वे ( वय ५० ) यांनी ४८ बैठका मारल्या. अनिरुद्ध बोऱ्हाडे याने सर्वात मोठ्या गुंडी १७ बैठका मारल्या. जय बजरंग तालीम मंडळ व शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने विजेत्या खेळाडूंना सन्मानचिन्ह व रोख बक्षिसे देण्यात आली. नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या वतीने प्रथम क्रमांकाचा मानकरी सौरभ ढोरे यास चांदीचे कडे देण्यात आले. सुनील चव्हाण व अनंता कुडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

यावेळी चंद्रकांत ढोरे, तुकाराम काटे, पंढरीनाथ ढोरे, सुधाकर ढोरे, महेंद्र म्हाळसकर, अनंता कुडे, दिनेश ढोरे, दिलीप म्हाळसकर, किरण म्हाळसकर, रवींद्र काकडे, भूषण मूथा, अविनाश चव्हाण, किरण भिलारे, शेखर वहिले, उमेश ढोरे आदी उपस्थित होते.

रोहित वाघवले या तरुणाने दगडी गोटी दोन्ही हातांवर धरून बैठका मारण्याचा अनोखा प्रकार सादर केला. तर मदन भिलारे यांनी दगडी गोटी दोन्ही हातांवर थांबवून धरत अनोखा प्रकार सादर केला. यावेळी काही तरुणांनी तिन्ही गोट्या नाकावरून, खांद्यावरून टाकण्याचा प्रयत्न केला.

यावेळी जय बजरंग तालीम मंडळाच्या वतीने चिराग वाघवले, प्रतीक देशमुख, वैष्णव आडकर, बजरंग पडवळ, सनी केदारी, केतन घारे, विपुल आडकर या खेळाडूंना स्व. पै. केशवराव ढोरे क्रीडा पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

हेही वाचलंत का? 

Back to top button