पुढारी ऑनलाईन डेस्क : ओमायक्रॉनच्या नव्या stealth व्हेरिएंटची भीती पुन्हा जगभरात पसरली आहे. ओमायक्रॉनची लाट पूर्व आणि आग्नेय आशियामधून पश्चिम युरोपमध्ये परत आली आहे. गुरुवारी दक्षिण कोरियामध्ये ६.२ लाख नवीन रुग्ण आढळले. अमेरिकेनंतर कोणत्याही देशात एका दिवसात नोंदवलेली ही सर्वाधिक प्रकरणे आहेत.
गेल्या सात दिवसांत दक्षिण कोरियातून २४ लाख रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत जर्मनीमधून १५ लाख, व्हिएतनाममधून १२ लाख, फ्रान्समधून ५.२ लाख आणि यूकेमधून ४.८ लाख रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी होळीनंतर भारतात प्रकरणांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. पण, यावर्षीची कोरोना आकडेवारीत घसरण झाली. मागील वर्षी होळीनंतरचा अनुभव चांगला नव्हता.
२०२० मध्ये जेव्हा भारतात पहिल्यांदा कोरोना विषाणूचा सामना करावा लागला तेव्हा लोकांनी होळीवर खूप संयम ठेवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार लोकांनी खबरदारी घेतली. मात्र, होळीच्या दिवशी लोक बेफिकीर झाले. दुसरी लाट येणार नाही असे वाटत होते. मात्र उत्सवानंतर त्याचा परिणाम दिसू लागला. एप्रिलमध्ये सुरू झालेली दुसरी लाट अत्यंत जीवघेणी ठरली. महिन्याच्या अखेरीस, भारतात कोरोना प्रकरणात जगात टॉपला पोहोचला होता. ३० एप्रिल रोजी ४ लाखांहून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉनमुळे कोविडची नवीन लाट येण्याचा धोका आहे. पूर्व युरोपमध्ये याचा प्रसार होत आहे. यामुळेच आर्मेनिया, अझरबैजान, बेलारूस, जॉर्जिया, युक्रेन आणि रशियामध्येही कोविडची प्रकरणे दुपटीने वाढली आहेत. तर दक्षिणपूर्व आशियामध्ये, हाँगकाँग, दक्षिण कोरियामध्ये प्रकरणे आधीच वाढली आहेत. त्याचवेळी आयआयटी कानपूरच्या तज्ज्ञांनीही जूनपर्यंत चौथ्या लाटेच्या आगमनाबाबत सांगितले आहे.
दक्षिण कोरिया, चीनमध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांमध्ये, इस्रायलने येथे नवीन प्रकार आणण्याची चर्चा केली आहे. इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, 'विमानतळावर पॉझिटिव्ह आढळलेल्या दोन प्रवाशांपैकी एकामध्ये कोरोनाचा नवीन प्रकार आढळून आला आहे. हा मुळात एक संमिश्र विषाणू आहे जो ओमिक्रॉन प्रकार बीए.१ आणि त्याचा उपप्रकार बीए.२ ने बनलेला आहे. ताप, डोकेदुखी आणि स्नायू दुखणे ही सौम्य लक्षणे त्या संक्रमित रुग्णांमध्ये दिसून आली.
ओमिक्रॉन गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत सापडला होता. तो झपाट्याने पसरला. परंतु रुग्णाची तीव्रता आणि मृत्यूची संख्या डेल्टाच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले. नवीन प्रकाराबद्दल अजून जास्त माहिती नाही. परंतु ते ओमिक्रॉनचे असल्याचे दिसून आले आहे.
रुग्णांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले?
नवीन प्रकारात, श्वसनसंस्थेच्या फक्त वरच्या भागावर परिणाम होतो. म्हणजे ते फुफ्फुसापर्यंत पोहोचत नाही आणि घशापर्यंतच मर्यादित राहते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, स्टील्थ व्हेरिएंट्सचा संसर्ग झालेल्या लोकांमध्ये चक्कर येणे, अशक्तपणा आणि थकवा ही लक्षणे दिसतात. विषाणूची लागण झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी ही लक्षणे दिसतात. याशिवाय ताप, खोकला, घसा खवखवणे, स्नायू दुखणे, थंडी वाजून येणे आणि हृदयाचे ठोके जलद होणे ही त्याची लक्षणे आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी सांगितले की, भारतातील कोविड-१९ साथीच्या रोगाचे व्यवस्थापन उर्वरित देशापेक्षा चांगले आहे. विशेषत: ओमिक्रॉनच्या प्रकरणांमध्ये अलीकडे झपाट्याने वाढ होत असताना. त्यांनी एका वेबिनारमध्ये सांगितले की, ओमिक्रॉन प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना इतर अनेक देशांपेक्षा चांगल्या व्यवस्थानामुळे भारताच्या सार्वजनिक आरोग्य उपायांच्या धोरणांमुळे मदत झाली.