धुळे : साक्रीच्या पश्चिम पट्ट्यातील पंचक्रोशीत होळी उत्सवाला सुरुवात

धुळे : साक्रीच्या पश्चिम पट्ट्यातील पंचक्रोशीत होळी उत्सवाला सुरुवात
Published on
Updated on

पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील हनुमंतपाडा येथे आजही 'एक गाव एक होळी' पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. या होळीच्या उत्सवाला साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सुरुवात झाली आहे. गावातील अविवाहित तरुण मुले एकत्रित येऊन सायकांळी खोंड्या पेटवून आनंदीत होऊन याची चाहूल गावकऱ्यांना देतात. तर अविवाहित मुली सायंकाळी होळी गीत (लोल) गातात. "होळी माय तू भोळी ग, सदा शिमगा खेळी ग" अशी होळीची गाणे आनंदाने, खुशीने सायंकाळी गावातील प्रत्येकाच्या अंगणात जाऊन म्हणतात.

तर पाचव्या दिवशी प्रत्येकाच्या घरातून हरभरा, वाटाणा, गहू असे धान्य दिले जाते. या धान्याच्या होळीला नैवद्य म्हणून डाळ्या शिजवून चढवतात, अशी ही प्रथा परंपरा सुरू आहे. फाग मागणे, रस्त्यावर दोन्ही बाजूला दोर हातात धरून पूजेचा टीळा नारळ देणे, रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या मोटरसायकल व इतर वाहनधारकांना अडवून त्यांच्याकडून फाग म्हणून पैसे मागितले जातात. ही एक जुनी परंपरा ही सुरू आहे.

हनुमंतपाडा हे चिंचगावठाण, झोळी पाडातील लहान मोठ्या तीन गल्ली मिळून एक होळी आहे. येथील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की, साधारण १०१ वर्षापासून येथे एक गाव एक होळी, गुण्यागोविंदाने एकत्र येऊन आदिवासी बांधव श्रध्देने आनंदाने साजरी करतात. ही परंपरा संपूर्ण तालुक्यालाच नाही, तर जिल्ह्यालाही माहिती आहे. पाचव्या दिवशी प्रत्येक घरातून पाच प्रकारचे धान्य मागितले जाते. ते एकत्र शिजवून त्याचा डाळ्या म्हणून नैवद्य दाखवितात. होळी साजरी करण्यासाठी संपूर्ण गावलोक एकत्र बसून होळी घ्यायला जाण्यासाठी ठरवतात. जंगलातून होळी पेटविण्यासाठी साबर नावाच्या झाडाचे लाकूड आणले जाते. तर कामाचं लाकूड होळीसाठी तोडले जात नाही.

लोक सायंकाळी नवे कपडे घालून, सजून धजून एकत्र येऊन होळीच्या मुख्य ठिकाणी जमतात. जागल्या म्हणजे गावकऱ्यांचा कामदार याला होळीची पूजा झाल्यावर होळी पेटवण्याचा मान दिला जातो. होळी पेटवली की सगळे आनंदाने आपले गोड अन्नपदार्थ बोना (नैवद्य) चडवतात. गावातील कोणालाही याच वर्षात मुल झालेलं असेल. तर मुलगा झाला म्हणून नारळ, तर मुलगीसाठी खोबऱ्याची वाटी होळीची वाटी, नारळ म्हणून वाहिली जाते. होळी पेटून खाली पडेपर्यंत कोणीही खाली बसत नाही. असा नियम असतो. जो खाली बसला त्याचाकडून दंड म्हणून कोंबडी घेतली जाते, अशी ही परंपरा आहे. ती मात्र आता प्रथा लोप पावत चालली आहे. आदिवासी परंपरेनुसार हे टिकवणे महत्वाचे आहे.

दोन दगड दोन्ही बाजूला ठेवून त्याचा भाला केला जातो. व दोन सागाच्या लाकडाची लहान छोठ्या काठ्या गाडून त्याला आंब्याच्या पानांपासून तयार तोरण बांधले जाते. त्या तोरणाखालून सगळे नारळ वाटी होळीत वाहिली जाते. होळी पडली की, पाखरी झेलून घेतली जाते. मग त्याला पाच फेरा मारून नदीला ही पाखरी पाण्यात दाबून आल्यावर होळीचा कपाळी टिळा लावून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात.

भेटीगाठी घेऊन उशिरा जेवण केले जाते. होळी पडल्यानंतर पाच दिवस पुढे याचा उत्साह असतो. पाचव्या दिवशी पेटवल्या होळीची राख आणून ती आपापल्या संपूर्ण घराला, कोठी कनगीला पाण्यात कालवून लावतात. पाचव्या दिवशी पुन्हा एकदा गावातील सगळे आनंदाने एकत्र येऊन होळी विझवण्यासाठी गावातील पाच पोरींना मान देतात. नवीन पाणी आणून ती विझवतात. होळी उत्सवाची सांगता मोठ्या आनंदाने पार पडते. अशी ही संपूर्ण परंपरा आजही हनुमंतपाडा गावातील सर्व आदिवासी बांधव पाळतात. आज डिजिटल युगात केले जाते हेही विशेष.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : दुष्काळ ते 300 एकर ऊस लागवड करण्याऱ्या हिंगणगावाची गोष्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news