पिंपरीत तीन महिन्यांत डेंग्यूचे 140 बाधित रुग्ण

पिंपरीत तीन महिन्यांत डेंग्यूचे 140 बाधित रुग्ण

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये गेल्या तीन महिन्यांत डेंग्यूचे एकूण 140 बाधित रुग्ण तर, हिवतापाचे 7 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. शहरामध्ये जुलै महिन्यात डेंग्यू रुग्णाचे 36, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी 52 बाधित रुग्ण आढळून आले. तर, हिवतापाचे ऑगस्टमध्ये 6 आणि सप्टेंबर महिन्यात 1 रुग्ण आढळून आला आहे. महापालिकेच्या वतीने आरोग्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी मास्क्युटो अबेटमेंट समितीची स्थापना केलेली आहे.

महापालिका आणि खासगी दवाखान्यांना डेंग्यू एनएसआय दूषित आढळून आलेल्या रुग्णाचा रक्तजल नमुना निश्चित निदानासाठी वायसीएम रुग्णालय येथे कार्यान्वित असलेल्या सेंटीनल सेंटरमध्ये पाठविण्याबाबत कळविले आहे. महापालिकेची 8 रुग्णालये आणि 34 दवाखान्यांमार्फत प्रत्येक आठवड्याला शहरातील विविध ठिकाणी लहान बालकांचे लसीकरण सत्र घेण्यात येत आहे.

महापालिका रुग्णालय व दवाखान्यांमध्ये डेंग्यूचे तपासणीसाठी आवश्यक रॅपीड कीट उपलब्ध करून दिलेले आहे. डेंग्यू व चिकनगुणिया आजाराच्या निश्चित निदानासाठी सेंटीनल सेंटरचाच पॉझिटिव्ह अहवाल आवश्यक आहे. कोणताही रॅपीड कीट अहवाल निश्चित निदानासाठी ग्राह्य धरण्यात येत नाही, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news