बारावीचा रसायनशास्त्रानंतर आता गणिताचाही पेपर फुटला, प्रश्नपत्रिका उत्तरासह व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल | पुढारी

बारावीचा रसायनशास्त्रानंतर आता गणिताचाही पेपर फुटला, प्रश्नपत्रिका उत्तरासह व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा

मुंबईतील मालाड येथे बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचे प्रकरण ताजे असतानाच आज सोमवारी गणिताचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे. मागील आठवड्यापासून  बारावीची  सुरू आहे. ऑफलाईन परीक्षेत आजचा गणिताचा पेपर फुटल्याने एकच गोंधळ उडाला आहे. श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी सुमारे पाऊण तास आधी प्रश्नपत्रिका उत्तरासह मोबाईलच्या व्हॉट्स अॅपवर आली. शिक्षण विभागाने मोबाईलवर आलेली प्रश्नपत्रिका व परीक्षेची प्रश्नपत्रिका एकच असल्याचा दुजोरा दिला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी परीक्षा झाली नाही. यावर्षी ती ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आज सकाळी साडेदहा वाजता गणित या विषयाचा पेपर होता. मात्र तत्पुर्वीच सुमारे पावणे दहा वाजेच्या सुमारास श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर ही प्रश्नपत्रिका उत्तरासह मिळाली.

उत्तरासहित प्रश्नपत्रिका आल्याने हा पेपर काही काळ अगोदरच फुटला असावा याला दुजोरा मिळत आहे. या परीक्षेसाठी तालुक्‍यात सुमारे तीन हजार विद्यार्थी बसले आहे. मोबाईलवर सोशल मीडियातून  प्रश्नपत्रिका उत्तरासह व्हायरल झाल्याने गोंधळ उडाला आहे.
दरम्यान, याबाबत शिक्षण विभाग तसेच शिक्षकांना कुठलीच माहिती नसल्याचे समजते. मात्र सदर प्रतिनिधीने यांच्याकडे याबाबत प्रश्नपत्रिका पाठवून विचारणा केली असता फुटलेली प्रश्नपत्रिकाही परीक्षेतील असल्याचे सांगण्यात आले.

यापूर्वी एका विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चा आज सुरू होती. यातच गणिताचा पेपर फुटल्याने सावळागोंधळ समोर आला आहे. या प्रकाराची चौकशी होण्याची मागणी पालकांमधून होत आहे. दरम्यान, याबाबत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनील वाळके यांना विचारले असता त्यांनी खात्री करून मोबाईलवर अगोदर मिळालेली प्रश्नपत्रिका परीक्षेतील एकच असल्याचे मान्य केले. मात्र हा प्रकार श्रीगोंद्यात झाला नसल्याचा दावाही त्यांनी केला.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : झुंड सिनेमा ज्यांच्यावर आधारित आहे त्या विजय बारसेंना काय वाटतं ‘झुंड‘विषयी ?

Back to top button