पुणे : पुढारी वृत्तसेवा
दहावीत शिकणार्या एका अल्पवयीन मुलीवर प्रेमवीराने शाळेच्या आवारात शिरून चाकूने वार केल्याचा भीषण प्रकार पुण्यातील वडगावशेरी भागात सोमवारी घडला. एकतर्फी प्रेमप्रकरणातून हा प्रकार झाल्याचा पोलिसांचा कयास असून, मुलीवर वार केल्यानंतर त्या मुलानेदेखील विष प्राशन केले. कपील भट्ट (वय. २२) असे हल्ला करणाऱ्या या तरुणाचे नाव आहे.
ही घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास वडगावशेरी परिसरातील ईनामदार शाळेसमोर घडली आहे. आज (सोमवार) मुलीच्या शाळेतील दहावीचा निरोप समारंभ होता. यावेळी आरोपी शाळेच्या आवारात घुसला आणि त्याने मुलीवर वार केले. भरदिवसा हा प्रकार घडल्यामुळे विद्यार्थ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमीक माहितीनुसार, गेल्या दिड महिन्यापासून आरोपी मुलगा मुलीला एकतर्फी प्रेमातून त्रास देत होता. पूर्वी दोघे एकाच परिसरात वास्तव्यास होते. तोंड ओळखीतून आरोपी तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत असवा. तिच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकारात मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार घडल्यानंतर आरोपी मुलाने तेथून पळ काढला होता. नंतर त्याने विषप्राशन केल्याची माहिती असून, त्याच्यावरहीखासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
घटनेचीमाहीती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, मागील काहीमहिन्यांपूर्वी बिबवेवाडीपरिसरात एका अल्पवयीन मुलीवर कोयत्याने वार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता. काही काळ जाताच पुन्हा तसाच आणखी एक प्रकार घडल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.