पाटण: जांभा दगडाची खाण केली सील | पुढारी

पाटण: जांभा दगडाची खाण केली सील

पाटण पुढारी वृत्तसेवा : पाटण तालुक्यातील सडानिनाई येथे वनविभागाच्या हद्दीत सुरू असलेली जांबा (चिरे) दगडाची खाण सील करण्यात आली आहे. वन विभागाने शुक्रवार दि. 11 रोजी ही कारवाई केली असून दोन ट्रक व ट्रॅक्टर जप्त केले आहेत. तसेच या ठिकाणी बांधलेले निवारा शेडही वन विभागाने जेसीबीने पाडले आहे.

वन विभागाचे ढोरोशी वनपाल व धायटी वनरक्षक हे 26 फेब्रुवारी रोजी वन हद्दीत फिरत होते. त्यावेळी त्यांना सडानिनाई येथे वन विभागाच्या हद्दीत भरत धोंडीबा झोरे (रा. सडानिनाई) हे जांबा दगड काढत असल्याचे निदर्शनास आले. तसेच वनविभागाच्या हद्दीत दगडी चिरे यांचे घरही मिळून आले.

त्यानुसार वनविभागाने गुन्हा दाखल करून खाणीतील खोदकाम बंद करण्याच्या सूचना भरत झोरे यांना दिल्या होत्या. असे असतानाही त्याठिकाणी खोदकाम सुरू असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानुसार गुरूवारी सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, वन अधिकारी एल. व्ही. पोतदार यांच्यासह वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी सडानिनाई येथे जाऊन भरत झोरे यांच्या खाणीची तपासणी केली.

यावेळी खाण बंद न करता दोन ट्रक, एक ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साह्याने जांभा दगड चिरे भरून वाहतूक करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे ही तिन्ही वाहने वन विभागाने जप्त केली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वन जमिनीवर अतिक्रमण करून तात्पुरत्या स्वरूपात बांधलेले घर वन विभागाने जेसीबीच्या साह्याने पाडले. तसेच खाणीतील खोदकाम साहित्य सील करून खाणीचे काम बंद केले.

पाटण तालुक्यातील सडावाघापूर हे संवर्धत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरात खाणकाम किंवा उत्खनन करता येणार नाही. जर कोणी उत्खनन करताना आढळून आल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल.
– महेश झांजुर्णे, सहाय्यक वनसंरक्षक, सातारा

Back to top button