

पुणे : पुढारी वृत्तसेवा
नगरसेवकांचे काउंट डाउन सुरू झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी पुढील चार दिवसांत विविध 50 ते 60 प्रकल्पांची उद्घाटने आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. हे कार्यक्रम शनिवारी व रविवारी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहेत.
कोरोनामुळे शहरातील विकासकामांवर मोठा परिणाम झाला होता. काही विकासकामे सुरू झाली, तर काही बाकी आहेत. पूर्ण झालेल्या कामांची उद्घाटने उरकली आहेत. मात्र, महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत 14 मार्च रोजी संपत आहे. मुदत संपल्यानंतर नगरसेवकांना कोणत्याही कार्यक्रमाचे अधिकृत उद्घाटन किंवा भूमिपूजन करता येणार नाही. त्यामुळे नगरसेवकांकडून मंजूर विकासकामांचे भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.
पुढील चार दिवसांत या कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले गेले आहे. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने पक्षाच्या नेत्यांची वेळ मिळू शकत नाही. केवळ शनिवार आणि रविवार हे दोनच दिवस हे बडे नेते उपलब्ध होऊ शकणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 29 कार्यक्रम, तर देेवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमांची सुरुवात सकाळपासूनच होणार आहे. बालाजीनगर येथे स्वर्गीय माणिकचंद दुगड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, वानवडी येथील रुग्णालय आणि बॅडमिंटन कोर्ट, टिंगरेनगर येथील ऑक्सिजन पार्क आदींचे उद्घाटन होणार आहे. तर फडणवीस आणि पाटील यांच्या हस्ते कर्वे रस्त्यावरील दुहेरी उड्डाणपूल, बाळासाहेब ठाकरे उद्यान, मुळा नदीवरील पुलाचे उद्घाटन आदी कार्यक्रम होणार आहेत. पुण्यातील राजकीय वातावरण यानिमित्ताने तापणार आहे. त्याच वेळी पोलिस यंत्रणेचीही सलग दुसर्या रविवारी धावपळ होणार आहे.