

पिंपरी : राहुल हातोले : 'जरा बर्फ टाकून द्या…' शितपेयाची अशी ऑर्डर देताय? तर जरा सावध व्हा… तुम्हाला दिला जाणारा बर्फ खाण्यास अयोग्य असू शकतो. अशा बर्फाला निळा रंग देण्याचा निर्णय केवळ कागदोपत्रीच असल्याची माहिती पुढे आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आदेशानुसार खाद्य बर्फ व अखाद्य बर्फ; अशी वर्गवारी केली आहे. खाण्याचा बर्फ आणि इतर वापरासाठीचा बर्फ ओळखण्यात यावा, ही यामागची भूमिका आहे. त्यानुसार निळा खाद्यरंग वापरुनच इतर वापरासाठीचा बर्फ तयार करण्याचे बंधन आहे.
या नियमाचे पालन न करता बर्फ उत्पादन करणारे कारखाने, साठा आणि वाहतूक करणार्यांवर कारवाईची तरतूद आहे. कारखान्यांचे परवाने रद्द होऊ शकतात.
वितरण करणार्या वाहनांमधील बर्फ आणि साठा होत असलेल्या ठिकाणीही तपासणी करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांना आहेत. नियमाचे पालन न केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते.
अखाद्य बर्फाला निळा रंग न दिल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड परिसरात तीन वर्षांपूर्वी केवळ दोन कारखान्यांवर कारवाई झाली आहे. त्यानंतर एकही कारवाई झालेली नाही.
कोरोनामुळे सध्या कारवाई झालेली नाही मात्र, लवकरच तपासणी सुरू करणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांकडून सांगण्यात येत आहे.
तीस लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात बर्फाचे उत्पादन घेणारे केवळ 2 कारखाने असल्याची नोंद अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आहे. एकीकडे खाद्य आणि अखाद्य बर्फाची वर्गवारी होत नाही, कोणतीही कारवाई नाही आणि केवळ दोन कारखान्याची नोंद असल्याने दररोज टनामध्ये विकल्या जाणार्या आणि नागरिकांच्या आरोग्याशी सबंधित असणार्या बर्फाकडे प्रशासनाचे किती लक्ष आहे, हे दिसून येते.
परवानाधारक कारखान्यांना खाद्यबर्फ बनविण्यासाठी शुद्ध पाण्यासाठी आरओ (मिनरल वॉटर) प्लॅन्ट असणे बंधनकारक आहे. क्षार चाचणी होणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून तपासणीच होत नसल्याने या नियमांचे पालन होते का, ही माहितीही उपलब्ध नाही.
काही रसवंती चालक, ज्युस, लिंबु सरबत, ताक, कोकम, निरा, सोडा व बर्फाचा गोळा विकणारे विक्रेते या अखाद्य बर्फाचा वापर करतात. बाजारात उपलब्ध असलेला बर्फ वापरला जात आहे.
अनेकदा बर्फाची वाहतूक अस्वच्छ पोत्यांतून झाल्याचे दिसते. तसेच काही उत्पादकांकडून खाण्यास अयोग्य असलेला अर्थात इतर वापरासाठी बनविलेला बर्फही हातगाडे व अन्य विक्रेत्यांकडे वापरला जात असल्याचे दिसून येते.
या बर्फाच्या सेवनामुळे आजार उद्भवू शकतात. अस्वच्छ बर्फामुळे घसादुखी, पोटदुखीसारखे आजार बळावू शकतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
"2018 मधील शासन निर्णयाप्रमाणे त्यावर्षी कारवाई केली. मात्र, कोविड प्रादुर्भावाच्या काळात कारवाई झाली नाही. उन्हाची सुरवात झाल्यामुळे शहरातील नागरिकांची ओढ थंड पेयाकडे अधिक असते. बर्फ कारखाने, हातगाडीवरील लिंबू सरबत, निरा, ताक, लस्सी आदींची विक्री करणारे हातगाडे, दुकानांची तपासणी करण्यास सुरवात केली आहे."
– एस. एस. देसाई, सहआयुक्त (अन्न) तथा न्यायनिर्णय अधिकारी, पुणे विभाग.
"शहरात सर्रासपणे अखाद्य बर्फाचा वापर खाद्यामध्ये केला जातो. मात्र खाद्य बर्फ व अखाद्य बर्फ कुठला? तो कसा ओळखावा? याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने कुठलीही जागृती केली जात नाही. तसेच कारवाई देखील नाही. त्यामुळे गैरप्रकार करणार्यांचे फावले आहे."
– मनोज पाटील,अध्यक्ष ग्राहक संरक्षण संस्था