उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल | पुढारी

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार असून अवघ्या देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकण्याची क्षमता असलेल्या उत्तर प्रदेशात काय होणार, यावर विशेष करून सर्वांची नजर आहे. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये या राज्यात भाजप बहुमताचे सरकार बनवेल, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. (Election2022 )

उत्तर प्रदेशात सात टप्प्यांमध्ये, मणिपूरमध्ये दोन टप्प्यात तर उत्तराखंड, पंजाब आणि गोवा या राज्यांत एका टप्प्यात अलीकडेच मतदान पार पडले होते. पाचही राज्यांचा निवडणूक निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे.

Election2022 : उत्तराखंड, मणिपूर आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांत भाजपला सरकार बनविण्याची संधी

मतदानोत्तर चाचण्यांचा विचार केला तर उत्तराखंड, मणिपूर आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांत भाजपला सरकार बनविण्याची संधी मिळण्याची शक्यता असून गोवा राज्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यादरम्यान जोरदार संघर्ष पहावयास मिळत आहे. पंजाबमध्ये पहिल्यांदाच आम आदमी पक्ष सत्तेत येऊ शकतो.

उत्तर प्रदेश विधानसभेचे एकूण संख्याबळ ४०३ इतके आहे. या राज्यात भाजप आणि समाजवादी पार्टी दरम्यान खरी लढत झाली होती. पंजाबमध्ये पंचरंगी लढती होत्या. पण येथे आम आदमी पार्टीचा दबदबा निर्माण होताना दिसत आहे. गोवा राज्यात भाजपला बंडखोरी आणि अंतर्गत सुंदोपसुंदीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये काँग्रेसकडून भाजपला जोरदार टक्कर मिळेल, असे मानले जात आहे. प्रत्यक्ष निवडणूक निकालादिवशी मतदार राजा कुणाच्या बाजूने कौल टाकणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Back to top button