पुणे : धनकवडी-आंबेगावपठार भागात समाविष्ट गावांतील मतदार निर्णायक

पुणे : धनकवडी-आंबेगावपठार भागात समाविष्ट गावांतील मतदार निर्णायक

ज्ञानेश्वर बिजले/बाजीराव गायकवाड

धनकवडी : पाणीपुरवठ्यासह अपुर्‍या नागरी सुविधा, गावांतील बकालपणा, याचा परिणाम नवीन प्रभाग क्रमांक 55 मध्ये (धनकवडी-आंबेगाव पठार) येत्या निवडणुकीत जाणवेल. समाविष्ट झालेल्या गावांतील मतदार निर्णायक ठरण्याची शक्यता असल्याने येथे सर्वच राजकीय पक्षांना कठीण परीक्षेला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

जुन्या प्रभाग 39 मधील (धनकवडी-आंबेगाव पठार) साठ टक्के भाग, तर महापालिकेत समाविष्ट झालेल्या आंबेगाव बुद्रुक, नर्‍हे या गावांतील 40 टक्के भाग एकत्रित करून नवीन प्रभाग 55 तयार झाला आहे. महापालिकेत धनकवडीचा समावेश होऊन तीन दशके झाली, तरी म्हणाव्या तशा सुविधा मिळाल्या नसल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे.

कष्टकऱ्यांची मोठी वस्ती

गल्ली, चाळी, बैठी घरे, अरुंद रस्ते, लहान जागेवर बांधलेल्या मोठ्या इमारती अशारीतीने गावचे गावपण अद्यापही टिकून आहे. कष्टकरी समाजाची वस्ती येथे मोठ्या प्रमाणावर आहे. सर्व्हे क्रमांक 15 व 16 मध्ये नव्याने विकसित झालेल्या रहिवासी भागात दाट लोकवस्ती असली, तरी मतदार नोंदणी कमी आहे. या भागात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. हा प्रश्न येत्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे.

जुन्या प्रभाग 39 मध्ये राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक व भाजपचा एक नगरसेवक आहे. त्यापैकी केवळ राष्ट्रवादीचे बाळासाहेब धनकवडे नव्या प्रभागात निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास त्यांना बंडखोरीचा धोका आहे. सोसायट्यांमध्ये भाजपचा प्रभाव असला, तरी गावांत राष्ट्रवादीचा जोर आहे. खडकवासल्याचे भाजपचे आमदार भीमराव तापकीर या भागातून दोनदा नगरसेवक झाले होते. विद्यमान नगरसेविका वर्षा तापकीर याही दोनदा निवडून आल्या.

या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे, श्रद्धा परांडे, सुवर्णा चव्हाण, चेतन मांगडे, युवराज वासवंड, पोपटराव खेडेकर, तानाजी दांगट, मंदा दांगट इच्छुक आहेत. भाजपकडून दीपक माने, अभिषेक तापकीर, विश्वास आहेर, विलास तापकीर यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेकडून सुनील खेडेकर, अ‍ॅड. प्रल्हाद कदम, मनसेकडून चंद्रकांत गोगावले, तर काँग्रेसकडून प्रशांत जाधव, भूषण रानभरे हे प्रमुख इच्छुक आहेत. आरक्षण जाहीर झाल्यानंतर या स्थितीत काही बदल होण्याची चिन्हे आहेत. भाजपचे आमदार तापकीर यांची प्रतिष्ठा या प्रभागात पणाला लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचाही या भागात जोर असून, त्यांना येथे चांगली संधी आहे. या दोन्ही पक्षांतच येथे अटीतटीची लढत अपेक्षित आहे.

अशी आहे प्रभागरचना

धनकवडी, आंबेगाव पठार, काशीबाई नवले मेडिकल कॉलेज, वृंदावन सृष्टी सोसायटी, कृष्णकुणाल रेसिडेन्सी, खेडेकरनगर, सन युनिव्हर्स सोसायटी, सिंहगड कॉलेज, शांतीयोग सोसायटी, सिद्धिविनायक आंगण, स्वामी आंगण सोसायटी, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुकचा भाग, कुदळेबाग, वडगाव बुद्रुक, चरवडवस्ती, घुलेनगर, दांगटनगर, विष्णू पूरम कॉलनी, साई आमराई, जानकीनगर, कृष्णाविहार, गणेशनगर, हिल टॉप सोसायटी, कमलविहार, होळकरनगर, आदर्श सोसायटी, दांगटनगर, मोहननगर, श्रीरामनगर, तानाजीनगर.

  • लोकसंख्या – 57,719
  • अनुसूचित जाती – 4,574

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news