बारावीची पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून; ‘या’ तारखेपासून भरता येणार अर्ज

बारावीची पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून; ‘या’ तारखेपासून भरता येणार अर्ज

Published on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थी आणि श्रेणी सुधार करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठीचा प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना 27 मेपासून भरता येणार आहे. तर बारावीची पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि सर्व विषय घेऊन बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेंतर्गत जुलै- ऑगस्ट 2024 आणि फेब्रु वारी- मार्च 2025 या लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील. पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेतली जाणार आहे. परीक्षेसंदर्भातील परिपत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

राज्यात 100 टक्के निकालाच्या 2 हजार 246 संस्था

राज्य मंडळाने जाहीर केलेल्या निकालात राज्यातील 21 संस्थामध्ये शुन्य टक्के निकाल लागल्याचे स्पष्ट झाले आहे. 10 टक्के निकालाच्या तीन, 20 टक्के निकालाच्या आठ, 30 टक्के निकालाच्या अठरा, 40 टक्के निकालाच्या त्रेपन्न, 50 टक्के निकालाच्या सत्यान्नव, 60 टक्के निकालाच्या 139 , 70 टक्के निकालाच्या 332, 80 टक्के निकालाच्या 755, 90 टक्के निकालाच्या 1 हजार 644, 90 ते 99.99 टक्के निकालाच्या 5 हजार 167 आणि 100 टक्के निकालाच्या 2 हजार 246 शैक्षणिक संस्था असल्याचे राज्य मंडळाने जाहीर केले आहे.

90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे 8 हजार 782 विद्यार्थी

राज्य मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात यंदा प्रज्ञावंताचा टक्का वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा राज्यात शतप्रतिशत गुण मिळवणारी एकमेव विद्यार्थिनी छत्रपती संभाजीनगर विभागातील आहे. 8 हजार 782 विद्यार्थी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे, 28 हजार 753 विद्यार्थी 85 ते 90 टक्के गुण मिळवणारे, 60 हजार 165 विद्यार्थी 80 ते 85 टक्के गुण मिळवणारे, 94 हजार 854 विद्यार्थी 75 ते 80 टक्के गुण मिळवणारे, 1 लाख 28 हजार 771 विद्यार्थी 70 ते 75 टक्के गुण मिळवणारे, 1 लाख 60 हजार 227 विद्यार्थी 65 ते 70 टक्के गुण मिळवणारे, 2 लाख 5 हजार 958 विद्यार्थी 60 ते 65 टक्के गुण मिळवणारे, 5 लाख 48 हजार 410 विद्यार्थी 45 ते 60 टक्के गुण मिळवणारे आणि 1 लाख 51 हजार 215 विद्यार्थी 45 टक्क्यांहून कमी गुण मिळवणारे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुढील वर्षीही परीक्षा प्रचलित पद्धतीनेच…

नव्या शैक्षणिक धोरणात दहावी-बारावीच्या परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ त्या परीक्षा सत्र पद्धतीने घेण्याबाबत सांगितले आहे. त्याशिवाय पाचवी आणि आठवीच्याही परीक्षा घेण्याबाबत नमूद केलेले आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. परीक्षा घेत असताना त्या सत्र प्रकारात घ्यायच्या का एक परीक्षा वर्णनात्मक आणि एक परीक्षा वैकल्पिक अशा घ्यायच्या यासंदर्भात राज्य शासन निर्णय घेईल आणि त्या निर्णयाची राज्य मंडळ अंमलबजावणी करेल. परंतु पुढील वर्षीदेखील दहावी- बारावीच्या परीक्षा या प्रचलित पध्दतीनेच होणार असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news