तडका : उमेदवारांची धडपड | पुढारी

तडका : उमेदवारांची धडपड

वडिलोपार्जित पक्ष चालवणे ही त्यांच्या मुलांची मक्तेदारी असते, यात शंका नाही. असे काही साधन उपलब्ध नसलेले नेते एकदिलाने, एक विचाराने एखादा पक्षही स्थापन करत असतात. या कारणामुळेच देशात पायलीचे पन्नास पक्ष आहेत. पक्ष आणि पक्षचिन्हांचा एवढा सुळसुळाट आहे की, मतदारांनाही बरेचदा संभ्रम निर्माण होतो. पुरुषांवर अन्याय होतो, अशी संभावना असणारे असंख्य लोक एकत्र आले आणि त्यांनी उत्तर प्रदेशात 2009 मध्ये ‘मेरा अधिकार राष्ट्रीय दल’, ज्याचा शॉर्टफॉर्म ‘मर्द पार्टी’ होतो, या पक्षाची स्थापना केली. सध्या देशभरात अनेक छोटे-मोठे पक्ष आहेत, ज्यांची धुरा त्यांच्या वारसांकडे आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीत ते आपले नशीब आजमावताना दिसत आहेत आणि मीच निवडून येणार असल्याचे दावा त्यांच्याकडून केला जात आहे. एककीकडे निवडून येण्याची त्यांची तळमळ पाहता, त्यांनी जनतेच्या कल्याणासाठीही काम करण्याची गरज आहे; पण फिकीर आहे कुणाला! केवळ सत्तेची खुर्ची त्यांना हवी आहे. देशात अनेक प्रमुख राजकीय पक्षांसह ढीगभर प्रादेशिक आणि छोटे पक्ष आहेत. निवडणूक कोणतीही असो, त्यांचा त्या ठिकाणी शिरकाव ठरलेलाच असतो. अगदी ग्रामपंचायतीपासून देशाच्या राजकारणात आपलाच दबदबा असल्याचा त्यांच्याकडून दावा केला जात असतो. लोकशाहीच्या महाउत्सवातही मतदार आपल्याला काही तरी मिळेल यासाठी तळमळ करत असतात.

मग निवडून आलेल्या उमेदवारांकडून आपण काय अपेक्षा करणार? चांगल्या आणि लोककल्याणासाठी झटणार्‍या उमेदवाराला निवडून देण्याची धमक त्यांच्यात नाही काय, याचाही यानिमित्ताने विचार करण्याची गरज आहे. एकदा का निवडून आले की, उमेदवार निवडणुकीत केलेल्या खर्चाची वसुली करण्यात व्यस्त असतो. मग तो जनतेचा अजिबात विचार करत नाही. भारतात जगातील मोठी लोकशाही नांदत असल्याचे आपण सातत्याने सांगत असतो. खरेच आपण त्याची कर्तव्ये पाळत असतो काय? नक्कीच नाही. याबाबत ग्रामीण मतदार मात्र निवडणुकीत हिरिरीने आपला सहभाग नोंदवत असतो आणि तळमळीने आपले कर्तव्य पाळत असतो. मग सरकारकडून सर्व सुख-सोयी हव्यात; पण मतदानाचे कर्तव्यच पाळत नसलेल्या शहरी मतदारांनी आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडायला नको काय? छोटे पक्ष निवडणुकीत आपले अस्तित्व दाखवण्यासाठी लढत असतात.

चुकून त्यांचा एखादा उमेदवार निवडून आला तर ते सत्तेत येणार्‍या पक्षाला पाठिंबा देतात आणि आपल्या पदरात काहीतरी पडावे यासाठी तडफडत असतात. भारतात केवळ राजकारणावरच अधिक भर दिला जातो. अन्य लोकांना आणि क्षेत्रांना काहीच महत्त्व दिले जात नाही. अन्य क्षेत्रांच्या विकासासाठी त्यांनी तळमळ दाखवायला नको काय? केवळ राजकीय तळमळ बाळगून आणि आपला वारसा पुढे चालवण्यासाठी अनेक नेते धडपडत असल्याचे चित्र आहे. एकूणच देश आणि देशवासीयांचे राहणीमान उंचावण्यासाठी धडपडणारे नेते आपल्या देशाला कधी मिळणार, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जागरूक मतदारांनी आता त्यासाठी पुढे येण्याची गरज असून, स्वतःसह देशाच्या हितासाठी तळमळ दाखवली तरच खर्‍या अर्थाने देश पुढे जाण्यास नक्की मदत होईल, हे तितकेच खरे आहे.

Back to top button