समीर सय्यद
पुणे : कोरोनामुळे त्याला काम गमवावे लागले. साहजिकच कामाच्या शोधासाठी तो पुण्यात आला… पण अनेक ठिकाणी शोध घेऊनही काम मिळाले नाहीच; तरीही तो डगमगला नाही! एका छोट्या टेम्पोतून जुन्या कपड्यांना अल्टर करण्याचा व्यवसाय त्यानं सुरू केला… दिव्यांग असूनही हिमतीनं आयुष्याला 'शिवण्याचं' काम तो जिद्दीने करतो आहे…!
ही प्रेरणादायी कहाणी आहे मुसा डांगी यांची. कोरोनामुळे अनेकजण बेरोजगार झाले. त्यामुळे आयुष्य बदलून गेले. अशांना पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागली. अशीच सुरुवात महाबळेश्वरजवळ असलेल्या गडालवाडी येथील मुसा मोहंमद डांगी यांनी पुणे कॅम्पातील भीमपुरा भागातून केली आहे.
चार महिन्यांपूर्वी डांगी पुण्यात आले. त्यांनी कामाचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र, रेडिमेड कपडे आणि कोरोनामुळे टेलरिंग व्यवसायावर मोठा परिणाम झाला. परिणामी कुठेही काम मिळाले नाही. त्यावेळी ओळखीच्या एका व्यक्तीने जुने कपडे शिवण्याचा (अल्टर) व्यवसाय सुचवला. हा व्यवसाय करण्यासाठी दुकान भाड्याने घेण्याची आर्थिक क्षमता मात्र त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे हा व्यवसायही करता येणार नाही, असे त्यांना वाटत होते; पण ते हटले नाहीत. त्यासाठी टेम्पो भाड्याने घेतला आणि व्यवसाय सुरू केला. डांगी दिव्यांग आहेत. चालण्यासाठी त्यांना काठीचा आधार घ्यावा लागतो. त्यांच्या कुटुंबात पत्नी, तीन मुले, आई आणि एक दिव्यांग भाऊ आहे. या अल्टरच्या व्यवसायावरच आता संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे.
दिव्यांगांना प्रतिमहिना दीड हजार रुपये मिळतात; परंतु इतर कोणतेही शासनाचे लाभ मिळालेले नाहीत. लहानपणी सायकलवरून पडल्याने कमरेखालील भाग निकामी झाला. डॉक्टरांनी तीन शस्त्रक्रिया केल्यानंतर, 'विनासहारा चालू शकतो, पण त्यासाठी सहा लाख रुपये खर्च येईल,' असे सांगितले. मात्र, हा खर्च कुठून करायचा असा प्रश्न आहे.
– मुसा डांगी