

सुरेश मोरे
वानवडी : वानवडी कौसरबाग प्रभाग क्रमांक 43 मध्ये राष्ट्रवादी, भाजप, काँंग्रेस, शिवसेना या चारही पक्षांचे प्राबल्य आहे. मनसेने देखील चांगली तयारी केली आहे. मात्र, आरक्षणानंतर उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. याशिवाय प्रत्येक पक्षात इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच होणार आहे. मुस्लिम समाजाच्या मतांचा विचार येथील प्रत्येक पक्षाला करावा लागणार आहे आणि तीच मते निर्णायक ठरणार आहेत.
प्रभाग क्रमांक 43 ची गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे जवळपास रचना सारखीच आहे. वानवडी हा काँग्रेसचा बाल्लेकिल्ला; मात्र अलिकडच्या काळात अशा काही घडामोडी घडल्या गेल्या, की काँग्रेस दोन नंबरचा पक्ष ठरला. 2007 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आपले खाते वानवडीत उघडले. तेव्हापासून आतापर्यंत ते या परिसराचे प्रतिनिधित्व करीत आहेत. 2017 च्या निवडणुकीत मात्र चारच्या प्रभागात मतांची विभागणी झाली आणि साळुंखेविहार रस्ता ते सोपानबाग या प्रभागात भाजपने बाजी मारली. यामध्ये त्यांनी दोन जागा जिंकल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले.
पाठीमागील काही निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष हा दोन नंबरचा पक्ष ठरला आहे. जुना प्रभाग क्रमांक 26 मधील 30 टक्के भाग वानवडी प्रभागाला जोडण्यात आला आहे. या प्रभागात सुशिक्षित मतदारांची संख्या मोठी असून, आकडेवारी कमी असली, तरी यामध्ये मुस्लिम मतांची संख्या जास्त आहे. याचबरोबर उच्चभ्रू सोसायट्यांमधील मते सर्वांसाठी निर्णायक ठरणार आहेत.
प्रभागातील इच्छुक उमेदवारांमध्ये राष्ट्रवादीकडून रत्नप्रभा जगताप, प्रशांत जगताप, नंदा लोणकर, मोहसीन शेख, राहुल जगताप, राजू अडागळे, भाजपकडून कालिंदा पुंडे, धनराज घोगरे, अॅड. महेश पुंडे, दिनेश होले, उमेश शिंदे, अॅड. राहुल बोराडे, श्याम चव्हाण, कोमल शेंडकर, काँग्रेसकडून साहिल केदारी, शिवसेनेकडून तानाजी लोणकर, ओंकार जगताप, मकरंद केदारी, स्वाती जगताप, अॅड. धनश्री बोराडे, रवींद्र जांभुळकर, मनसेकडून रोहन गायकवाड यांचा समावेश आहे.
वानवडीतील शिवाजी महाराज पुतळा, विकासनगर ते एसआरपी ग्रुप 2 सीमा, महंमदवाडी वानवडी शिव, दक्षिणेला सनसश्री सोसायटीकडून पश्चिम दिशेला, सिध्दार्थनगर, एनआयबीएम, दक्षिणेला महादेव मंदिर, कौसरबाग, स्लाटर हाऊस, बोराडेनगर, नेताजीनगर.