स्थायी समितीकडून उपसूचनांचा “संकल्प”

स्थायी समितीकडून उपसूचनांचा “संकल्प”

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : विविध 589 कामांच्या तब्बल 1 हजार 58 कोटींच्या तरतूदीतील निधीतील चढ व घट करत उपसूचनेद्वारे सन 2022-23 वर्षाच्या अर्थसंकल्पास स्थायी समितीने मंजुरी दिली.

अंतिम मंजुरीसाठी तो सर्वसाधारण सभेकडे पाठविला आहे. आयुक्त राजेश पाटील यांनी केलेला अर्थसंकल्प चांगला असल्याचे कौतुक सदस्यांनी केले.

समितीची ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विशेष सभा बुधवारी (दि.23) झाली. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे होते.

प्रशासनाने मूळ 4 हजार 961 कोटी 65 लाखांचे आणि केंद्र व राज्य शासनाचे निधी धरून एकूण 6 हजार 497 कोटी 2 लाखांचा अर्थसंकल्प समितीसमोर शनिवारी (दि.18) सादर केला होता.

अर्थसंकल्पातील निधीत कोणतीही वाढ न करता विविध कामांत घट व वाढ सुचविण्यात आली आहे.

सन 2021-22 च्या सुधारीत अर्थसंकल्पात एकूण 247 कामांसाठी एकूण 106 कोटी 29 लाखांची उपसूचना देण्यात आली आहे. सन 2022-23 च्या अर्थसंकल्पासाठी एकूण 275 कामांसाठी एकूण 885 कोटी 66 लाखांची वाढ व घट सूचविण्यात आली आहे.

तर, नवीन 67 कामांसाठी 66 कोटी 87 लाखांची वाढ व घट करण्याची शिफारस समितीने केली आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात आवश्यक त्या कामांसाठी दरवर्षी प्रत्येकी 25 विविध लहान व मोठ्या एकूण 589 कामांच्या तब्बल 1 हजार 58 कोटींच्या निधीच्या तरतूदीमध्ये चढ व घट करण्यात आली आहे.

तशी शिफारस सर्वसाधारण सभेकडे करण्यात आली आहे. यातील किती वर्गीकरण व नवी कामे आयुक्तांकडून स्वीकारल्या जातात. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सभेत अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे, सदस्य नीता पाडाळे, अभिषेक बारणे, शत्रुघ्न काटे, सुरेखा बुर्डे, मीनल यादव यांनी अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचे सांगत आयुक्तांचे कौतुक केले.

त्यासोबतच प्रभागातील कामांना निधी देऊन विकासकामे केल्याने आयुक्तांचे आभार मानण्यात आले. सदस्य सुजाता पाडाळे यांनी प्रभागासाठी दिलेला निधी पुरेसा नसून तो कमी असल्याची खंत व्यक्त केली.

सर्वसाधारण सभेत मंजुरी देऊनही आयुक्तांनी निधी पळविला : कांबळे नवी सांगवी, पिंपळे गुरव, कवडेनगर प्रभाग क्रमांक 31 मधील विकासकामे करण्यासाठी निधी नव्हता. तो देण्याबाबत आयुक्तांकडे दोन वर्षे पाठपुरवा केला. वारंवार विनंती करूनही तो मिळाला नाही.

निधी नसल्याने कामे होत नसल्याचे सांगत आयुक्तांनी हात झटकले. अखेर सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन निधी वर्गीकरण करून घेतला. त्यानंतरही अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली नाही.

अनेक कामांना शून्य तरतूद ठेवली आहे. त्यामुळे प्रभागात विकासकामे होणार नाही. आयुक्तांचा हा दुप्पटीपणा आहे. निधी उपलब्ध करूनही त्यांनी केवळ भाजप नगरसेवकांना अडचणी आणण्यासाठी हा प्रकार त्यांनी जाणीवपूर्वक केला आहे.

पालिका 13 मार्चला बरखास्त झाल्यानंतर ते पाहिजे तसा निधी वर्ग करून कामांचे श्रेय घेतील, असा आरोप सदस्य अंबरनाथ कांबळे यांनी केला. त्यांनी अर्थसंकल्पावर टीका केली.

नितीन लांडगे म्हणाले की, भोसरीतील सहल केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारणे. अंकुशराव लांडगे नाट्यगृहामधील जागेत एसटीपी प्रकल्प उभारणे.

उर्वरीत मोकळ्या जागेत महावितरण कंपनीसाठी स्विचिंग स्टेशन उभे करण्यास जागा देणे. भोसरीतील नवीन रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालवून नागरिकांना 24 तास अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा देणे. विविध माध्यम प्रतिनिधींसाठी वल्लभनगर येथे पत्रकार भवन उभारावे या कामांची शिफारस ही सभेकडे केली आहे.

पुढील काळात पिंपरी-चिंचवड शहराचा स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक होईल. हा अर्थसंकल्प सर्व समावेशक असल्याचे त्यांनी सांगितले.

पदाधिकारी, अधिकार्‍यांसाठी ई-वाहन वापरण्यास प्रोत्साहन : अ‍ॅड. लांडगे

पर्यावरणाचा समतोल राखला जावा. शहरातील प्रदूषण कमी व्हावे यासाठी पदाधिकारी व अधिकार्‍यांसाठी इलेक्ट्रीक वाहन खरेदी करावेत. प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांच्या स्मरणार्थ आकुर्डीमध्ये स्मारक उभारणे. शहरातील सर्व बीआरटी मार्गांवरील बसथांब्यांवर महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह उभारणे.

इंदूर पॅटर्न प्रमाणे शहरातील कचरा संकलन व प्रक्रिया करण्यास चालना देणे. 'स्वच्छाग्रह' ब्रँडद्वारे शहरभर स्वच्छता कायम राखली जाईल यासाठी नियोजन करणे, अशी शिफारस सर्वसाधारण सभेकडे करण्यात आली आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news