Russia vs Ukraine : गुप्तहेर ते राष्ट्राध्यक्ष, कणखर नेता म्हणून व्लादिमीर पुतीन यांनी कशी मिळवली ओळख? | पुढारी

Russia vs Ukraine : गुप्तहेर ते राष्ट्राध्यक्ष, कणखर नेता म्हणून व्लादिमीर पुतीन यांनी कशी मिळवली ओळख?

पुढारी ऑनलाईन डेस्क 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गुरुवारी सकाळी युक्रेनमध्ये (Russia vs Ukraine) लष्करी कारवाईची घोषणा केली. त्यानंतर रशियाने युक्रेनमधील काही शहरांवर क्षेपणास्त्रे हल्ले केल्याचे वृत्त आहे. रशियाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून लुहान्स्क प्रांतात रशियाची ५ विमाने आणि हेलिकॉप्टर पाडली असल्याचा दावा युक्रेनियन सैन्याने केला आहे. तर रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनमधील आतापर्यंत ७ जण ठार आणि ९ जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. जगाला न जुमानता पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला चढवला आहे.

व्लादिमीर पुतीन यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९५२ रोजी रशियातील सेंट पीटर्सबग शहरातील सामान्य कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव व्लादिमीर स्पिरिडोनोविच पुतीन व आईचे नाव मारिया इव्हानोव्हना शेलोमोवा असे आहे. पुतीन यांची आई मारिया एका फॅक्टरीमध्ये काम करत होत्या. तर पुतीन यांचे वडील प्रथम आर्मीमध्ये होते. त्यानंतर त्यांनी ऑटोमोबाईल फॅक्टरीमध्ये काम करण्यास सुरूवात केली. लहानपणापासून पुतीन हे तापट स्वभावाचे होते. ८ वर्षाचे असताना त्यांनी प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षण घेण्यास सुरूवात केली.(UkrainevsRussia)

हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असताना त्यांना ज्युदो आणि सांबो या क्रीडा प्रकारात आवड निर्माण झाली होती. रशियातील चित्रपटात ज्युदोचा वापर पाहून पुतीन यांना ज्युदोमध्ये आवड निर्माण झाली. शिक्षण घेत असतानाच त्यांचा संपर्क कम्युनिष्ट पार्टी ऑफ सोव्हियत युनियन या पक्षाशी आला. या पक्षासोबत काम करत करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.

कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर सरकारद्वारा संचालित इंटेलिजन्स एजन्सी केजीबीमध्ये ते रुजू झाले. त्यांचे ट्रेनिंग केजीबी मॉस्को येथे झाले. प्रशिक्षणानंतर पुतीन यांनी मुख्य सुरक्षा एजन्सी केजीबीच्या डायक्टरेट सेक्रेटरी या पदावर काम करण्यास सुरूवात केली. तिथले पुतीन यांचे काम पाहून त्यांना काउंटर इंटेलिजन्स डिव्हीजनमध्ये काम करण्यांची संधी देण्यात आली. १९८५ – १९९० या काळात ते पूर्व जर्मनीच्या ड्रेस्डेन या शहरात यंडर कव्हर ऑफिसर म्हणून काम करत होते. जर्मनीत राहूनदेखील पुतीन यांनी तिथे चांगले काम केले. या कामामुळे ल्युटिनंट कर्नल या पदावर बढती करण्यात आली. यानंतर पुतीन यांना इंटेलिजन्स ऑफिसच्या हेड ऑफ डिपार्टमेंटचे सिनिअर असिस्टंट बनवण्यात आले. १९९० च्या दरम्यान ते लेनिनग्राडमध्ये परत आले.

यावेळी त्यांना लेनिनग्राड विद्यापीठात रेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आले. यानंतर डेप्युटी चेअरमन म्हणून सेंट पीटर्सबर्ग सिटीमध्ये ते रुजू झाले. इथे काम करण्यास सुरूवात केल्यानंतर पुतीन यांनी केजीबीमधील पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर पुतीन यांचे लक्ष राजकारणाकडे लागले होते. ११९६ मध्ये ते आपल्या परिवारासह मॉस्कोला गेले. तिथे त्यांना प्रेसिडेंसिअल प्रॉपर्टी मॅनेजमेंट डायरेट्रेटच्या डेप्युटी चीफ म्हणून काम सुरु केले. त्यानंतर ते चीफ ऑफ मेन कंट्रोल डायरेट्रेट बनले. कमी कलावधीत त्यांनी महत्वाच्या अनेक पदांवर काम केले. (Russia vs Ukraine)

काही काळानंतर पुतीन यांनी Security Council of Russian Federationचे सेक्रेटरी पदावर काम केले. १९९९ मध्ये त्या काळातील रशियाचे राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्तसिन यांनी व्लादिमीर पुतीन यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. २००० या वर्षी त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. आणि पुतीन यांना आपला उत्तराधिकारी म्हणून जाहीर केले. मार्च २००० मध्ये पुतीन पहिल्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले. २००० ते २००८ या कालावधीत ते राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यरत होते. या कालावधीत ते रशियाचे दोन वेळा राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांना तिसऱ्यांदा या पदावर काम करणयाची इच्छा असूनही त्यांना राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. २००८ मध्ये पुतीन यांच्या राजीनाम्यानंतर दिमित्री मेदवेदेव (Dmitry Medvedev) हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले.

२०१२ मध्ये ते परत सत्तेत आले. ते तिसऱ्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले. पहिल्यांदा रशियामध्ये राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाल हा चार वर्षांचा होता. २०११ मध्ये तो ४ वरून ६ वर्षे करण्यात आला. त्यामुळे पुतीन २०११ ते २०१७ दरम्यान राष्ट्राध्यक्ष झाले. २०१८ मध्ये होणारी निवडणूक परत लढवण्याचा पुतीन यांनी निर्णय घेतला. या निवडणुकीत पुतीन पुन्हा एकदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. आता ते २०२४ पर्यंत या पदावर कार्यरत राहणार आहेत. (Russia vs Ukraine)

Back to top button