Lonavla : लग्नाचे खोटे अमिष दाखवून तरूणीची आर्थिक फसवणूक, १५ लाखांना गंडा | पुढारी

Lonavla : लग्नाचे खोटे अमिष दाखवून तरूणीची आर्थिक फसवणूक, १५ लाखांना गंडा

लोणावळा, पुढारी वृत्तसेवा  : जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर खोटे प्रोफाइल तयार करून त्याद्वारे लोणावळा शहरातील एका अविवाहित नोकरदार मुलीला लग्न करण्याच्या नावाखाली तब्बल 14 लाख 90 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्याचा प्रकार लोणावळा शहरात घडला आहे. यातील आरोपीला लोणावळा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (Lonavla)

 नहुश प्रशांत म्हात्रे उर्फ तन्मय म्हात्रे (रा. करोद विमानतळ जवळ, ता. उरण, जि. रायगड) असे या आरोपीचे नाव आहे. लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवर स्वतःचे खोटे प्रोफाइल बनवून वेगवेगळ्या तरुणींना आर्थिक गंडा घालणाऱ्या या महाठगावर अशाच प्रकारचे तब्बल सात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पिंपरी आणि पुणे याठिकाणी दाखल आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी तरुणी ही अविवाहीत आहे. एप्रिल २०२१ मध्ये या तरुणीने जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर स्वतःचे प्रोफाईल बनविले होते. तेव्हा या प्रकरणातील आरोपीने नहुश प्रशांत म्हात्रे या नावाने मॅरेज प्रपोजल साठी फिर्यादी तरुणीला रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर फिर्यादी तरुणी व आरोपी यांची ओळख झाल्यानंतर आरोपीने संबंधित तरुणीला लग्न करण्याबाबत विचारणा करीत तिचे स्थळ त्यास पसंत असल्याचे सांगितले. (Lonavla)

विश्वास ठेवलेल्या तरुणीकडून आरोपीने एप्रिल २०२१ ते दिनांक १५/०१/२०२२ रोजी पर्यंत वेळो वेळी फोन करून वेगवेगळी कारणे सांगत तब्बल १४ लाख ९० हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने प्राप्त केले. त्यानंतर संबंधित तरुणीने तिचे पैसे परत देणेबाबत आरोपीला फोन केला असता त्याने या तरुणीला शिवीगाळ करीत दमदाटी केली. (Lonavla)

याप्रकरणी लोणावळा पोलिसांकडून आरोपी नहुश प्रशांत म्हात्रे उर्फ तन्मय म्हात्रे याच्याविरुद्ध भा दं वि कलम ४१९, ४२०, ५०७, माहिती तंत्रज्ञान कायदा २००० कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाकडून आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. सीताराम डुबल, सागर धनवे हे करीत आहेत. (Lonavla)

हेही वाचलतं का?

Back to top button