सोशल मीडियावरील मैत्रीचा अडीचशे पुणेकरांना झटका! | पुढारी

सोशल मीडियावरील मैत्रीचा अडीचशे पुणेकरांना झटका!

अशोक मोराळे

पुणे : फेसबुकवर अनोळखी व्यक्तीशी ‘फ्रेंडशीप’ केल्यानंतर गेल्या वर्षभरात पुण्यातील तब्बल 263 महिला व पुरुषांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये आयटी इंजिनिअर, विद्यार्थी, डॉक्टर, निवृत्त शिक्षक, निवृत्त शासकीय अधिकारी, खासगी कंपनीतून वरिष्ठ पदावरून निवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिक अशा उच्च शिक्षितांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सायबर पोलिस सांगतात.

दाऊद मालमत्ता व्यवहार प्रकरण : नवाब मलिकांची ईडी कार्यालयात चौकशी सुरु

एकदा मैत्रीच्या जाळ्यात खेचल्यानंतर आयफोन किंवा इतर महागड्या विदेशी वस्तू पाठवल्याच्या बहाण्याने हा आर्थिक गंडा घातला जात आहे. त्यामुळे फेसबुकवरील अनोळखी मैत्री बँक खाते रिकामे करीत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 76 जणांचे फेसबुक हॅक करून पैसे मागितल्याच्या तक्रारीदेखील सायबर पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

US Vs Russia : अमेरिका आणि कॅनडाने रशियावर लादले कडक आर्थिक प्रतिबंध

फेसबुक व इन्स्टाग्रामवरून अनेकजण आपल्या जुन्या मित्रांना शोधत असतात. काहीजण नवे मित्र बनवत असतात. मात्र, फेसबुकवर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करणे अनेक वेळा महागात पडल्याचे दिसून आले आहे. सायबर चोरटे फेसबुकवर बनावट नावाने प्रोफाइल उघडून त्याच्यावर चांगल्या तरुणी अथवा तरुणाचा फोटो टाकतात. त्यानंतर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवितात. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारलेल्या व्यक्तीशी चॅटिंग सुरू करून हळूहळू ओळख वाढविण्यास सुरुवात केली जाते. परदेशात मोठ्या पदावर असल्याचे सांगितले जाते अथवा खूप श्रीमंत असल्याचे भासविले जाते.

कोल्हापूर : धक्कादायक! रस्त्याअभावी महिलेने दिला ओढ्यातच बाळाला जन्म, चादरीचा केला पाळणा

पुढे काही दिवसांनंतर परदेशातून महागडे गिफ्ट पाठविले असल्याचे सांगत ते सोडवून घेण्यास सांगितले जाते. नंतर कस्टममधून फोन करून गिफ्टसाठी पैसे उकळण्यास सुरुवात केली जाते. पैशाच्या अथवा गिफ्टच्या आमिषाने नागरिक पैसे भरत जातात. पैसे भरल्यानंतरही गिफ्ट मिळत नाही. फसवणूक झाल्याचे खूप उशीरा लक्षात येते. तोपर्यंत पाठविलेले पैसे सायबर चोरटे काढून घेतात.

दिशा सालियन प्रकरण : आम्हाला आत्महत्या करावेसे वाटते!

अनोळखी व्यक्तीसोबत समाजमाध्यमांवर मैत्री करणे टाळले पाहिजे. फेसबुकच्या ओळखीनंतर कोणत्याच प्रकारची आर्थिक देवाणघेवाण करता कामा नये. अनेकदा सायबर चोरटे बनावट खाती तयार करून नागरिकांना आपल्या जाळ्यात खेचतात. त्यामुळे प्रलोभनालादेखील बळी पडता कामा नये.
                                                       -डी. एस. हाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर

आपण फसवणूक टाळू शकतो…

  • अनोळखी व्यक्तींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविणे किंवा घेणे टाळा
  • सोशल मीडियावर ओळख झालेल्या व्यक्तीला भेटल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नका
  • सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ, वैयक्तिक माहिती तरुणींनी सर्वांना दिसेल अशी ठेवू नये
  • वेळोवेळी सोशल साईट्स व अ‍ॅपवरील प्रायव्हसी सेटींग तपासा
  • समोरील व्यक्तीच्या आमिषाला बळी पडू नका
  • विदेशातील महागड्या गिफ्टच्या प्रलोभनाला भुलू नका

Back to top button