पुणे : पुढारी वृत्तसेवा
वाहन चालकाकडून पाच हजाराची लाच घेताना पकडलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे; तर 'त्या' पोलिस निरीक्षकालादेखील एक महिन्यासाठी नियंत्रण कक्षात बसविण्यात आले आहे. याबाबत पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी आदेश काढले.
दिलीप दत्तू फुंदे असे निलंबित केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर, पोलिस निरीक्षक ए. डी. दळवी यांना नियंत्रण कक्षाला सलग्न करण्यात आले आहे. फुंदे हे बंडगार्डन वाहतूक विभागात नेमणुकीला आहेत. १९ फेब्रुवारी रोजी मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनाला त्यांनी अडविले. त्यांच्या वाहनाचा इन्शुरन्स व रजिस्ट्रेशन संपल्यामुळे त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी सात हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. यामध्य पाच हजार रूपये घेताना त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहूल श्रीरामे यांनी फुंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
बंडगार्डन वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक डी. एस. दळवी यांनी प्रभारी अधिकारी म्हणून कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक होते. त्यांचे नियंत्रण नसल्यामुळेच पोलिस खात्याची बदनामी झाली. त्यामुळे त्यांना एक महिन्यासाठी नियंत्रण कक्षात सलग्न करण्याचे आदेश पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काढले आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसापासून बंडगार्डन वाहतूक विभाग विविध कारणामुळे चर्चेत आहे. विभागाच्या समोरच एकाच ठिकाणी उभा राहून टोळक्याने या ठिकाणी कारवाई केली जाते. त्याचबरोबर कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली वाहनचालकांना अनेक तास ताटकळत उभे केले जाते असा आरोप वाहन चालकांनी केला आहे.