

पुणे : पुढारी वृत्तसेवा
स्थायी समितीच्या फक्त 14 दिवसांच्या कालावधीसाठी दोन माजी अध्यक्षांना संधी देत राष्ट्रवादी काँग्रेसने भाकरी फिरविली आहे. तर भाजप, सेना आणि काँग्रेस यांनी मात्र विद्यमान सदस्यांना कायम ठेवले आहे.
स्थायी समितीमधील आठ सदस्यांचा कार्यकाळ येत्या 28 फेब्रुवारीला संपत आहे. मात्र, महापालिकेच्या मुख्य सभेचा कार्यकाळही येत्या 14 मार्चला संपुष्टात येत असल्याने फक्त दोन आठवड्यांसाठी स्थायी समितीवर नवीन सदस्य आणि अध्यक्ष निवड याचा सोपस्कार पार पडणार का याबाबत साशंकता होती. याबाबत महापालिकेने थेट नगर विकास खात्याकडून अभिप्राय मागविला होता. मात्र, नगर विकासकडून कोणताही अभिप्राय न आल्याने पालिकेने सदस्य निवडीसाठी सोमवारी खास सभेचे आयोजन केले होते.
या सभेत सत्ताधारी भाजपने मानसी देशपांडे, वर्षा तापकीर, सुनीता गलांडे, उज्ज्वला जंगले, शिवसेनेकडून बाळा ओसवाल तर काँग्रेसने लता राजगुरू या कार्यकाळ संपणार्या सर्व सदस्यांना पुन्हा संधी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र नंदा लोणकर आणि अमृता बाबर यांच्या जागी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे व अश्विनी कदम या अनुभवी नगरसेवकांना संधी दिली आहे.
गेल्या काही महिन्यांत राष्ट्रवादीने ज्या विषयांना विरोध दर्शविला होता आणि त्या विरोधात आंदोलनने केली होती, त्यास विषयांना स्थायी समितीत पक्षाच्या सदस्यांनी पाठिंबा देण्याचे एक नव्हे तर अनेक प्रकार घडले होते. त्याच पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून काही मोठ्या प्रकल्पाचे प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्याची शक्यता आहे. तसेच, महापालिकेचे अंदाजपत्रकही मंजुरीसाठी येणार आहे. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने अनुभवी सदस्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या सदस्यांच्या कार्यकाळात समितीच्या दोन बैठका होण्याची शक्यता आहे.