

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकारी, कर्मचार्यांप्रमाणे महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना धन्वंतरी स्वास्थ योजनेचा लाभ मिळणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित या सुधारित प्रस्तावाला अखेर, आयुक्त शेखर सिंह यांनी सोमवारी (दि.4 ) हिरवा कंदील दिला आहे.
मागील पाच वर्षांपासून पाठपुरावा
पालिका सेवेतील व सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचार्यांसाठी तसेच, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्यांसाठी धन्वंतरी स्वास्थ ही वैद्यकीय योजना 1 सप्टेंबर 2015 पासून लागू करण्यात आली आहे. त्यांच्या लाभ पत्नी, पती व दोन मुलांनाही मिळतो. त्यांच्याबरोबर पालिकेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना व सेवानिवृत्त शिक्षकांना या योजनेचा लाभ मिळावा, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मागील पाच वर्षांपासून विविध शिक्षक संघटनांचा त्यासाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर, पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी शिक्षकांना लाभ देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक यांचा धन्वंतरी योजनेत समावेश केला
जाणार आहे.
खासगी रुग्णालयात शिक्षकांना कॅशलेस उपचार मिळणार
योजनेचा 105 शाळांमधील एकूण 1 हजार 235 शिक्षकांना लाभ होणार आहे. पालिका कर्मचार्यांप्रमाणे सेवेतील शिक्षकांकडून 300 रुपये प्रति महिना, तर सेवानिवृत्त शिक्षकांकडून 150 रुपये प्रति महिना रक्कम घेतली जाणार आहे. या योजनेतून खासगी रुग्णालयात शिक्षकांना सर्व आजारांवर कॅशलेश उपचार मिळणार आहेत. तर, हा खर्च महापालिका खासगी रूग्णालयास अदा करणार आहे. दरम्यान, शिक्षकांना राज्य शासनाकडून अनुदान मिळत असल्याने दरमहा 600 रूपये रक्कम शिक्षकांकडून घेण्याबाबत पालिका प्रशासन अडून बसले होते. तसेच, शिक्षकांचा सर्व कारभार तत्कालीन शिक्षण मंडळातर्फे चालत होता. त्यामुळे ही योजना लागू करण्यास विलंब झाला. अखेर आयुक्तांनी 600 ऐवजी 300 रूपये घेण्यास सहमती दिली आहे. दरम्यान, माध्यमिक शाळेतील शिक्षकांना सुरूवातीपासून या योजनेचा लाभ दिला जात आहे.
सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर लाभ मिळणार
महापालिका अधिकारी, कर्मचार्यांप्रमाणे शिक्षकांनाही धन्वंतरी स्वास्थ योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी धोरणात बदल करण्यात येणार आहे. स्थायी समिती व सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर प्राथमिक शिक्षकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे, महाालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.
हेही वाचा :