पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आता तीन झोन

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आता तीन झोन

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात सध्या दोन झोन (परिमंडळ) आहेत. उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली या झोनचे कामकाज चालते. मात्र, शहर परिसरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी आणखी एक झोन तयार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. येत्या काही दिवसांत नवीन झोनला मंजुरी मिळण्याची शक्यता पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

पिंपरी- चिंचवड शहर परिसरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी 15 ऑगस्ट 2018 रोजी स्वतंत्र आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर दोन झोन निर्माण करण्यात आले. सध्या उपायुक्त विवेक पाटील आणि उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांच्याकडे झोनची जबाबदारी आहे. याव्यतिरिक स्वप्ना गोरे यांच्यासह गुन्हे शाखेसह, मुख्यालय, प्रशासनाची जबाबदारी आहे. दरम्यान, संदीप डोईफोडे आणि शिवाजी पवार या दोघांची नव्याने पोलीस उपायुक्त म्हणून पिंपरी चिंचवड शहरात 18 ऑगस्ट रोजी बदली झाली. मात्र त्यांच्याकडे अद्याप कोणताच पदभार देण्यात आलेला नाही. तीन झोन होणार असल्याने त्यांच्याकडे जबाबदारी न दिल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता 15 दिवसांत झोनच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतरच नव्याने हजर झालेल्या पोलीस उपायुक्तांकडे पदभार देण्यात येणार आहे.

सध्या दोन परिमंडळांमध्ये चार सहायक पोलीस आयुक्त कामकाज पाहतात. तिसर्‍या परिमंडळाची निर्मिती झाल्यावर सहा सहायक पोलीस आयुक्त असणार आहेत. यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून चार सहायक आयुक्त पदाच्या निर्मितीला मंजुरी मिळालेली आहे. मात्र, याबाबतचा अध्यादेश काढण्यात आलेला नाही. लवकरच हा देखील अध्यादेश काढण्यात येईल, असेही पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.

अशी असणार परिमंडळाची रचना
परिमंडळ – 1
सांगवी, काळेवाडी (प्रस्तावित), भोसरी, पिंपरी, चिंचवड, निगडी
परिमंडळ – 2
वाकड, हिंजवडी, देहूरोड, शिरगाव, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी
परिमंडळ – 3
चाकण, म्हाळुंगे, आळंदी, दिघी, एमआयडीसी भोसरी.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news