

पुणे : पुढारी वृत्तसेवा
'मला कितीही उंच किल्ल्यावर चढताना भीती वाटत नाही. भूक लागली की पाणी पितो. किल्ला चढताना 'जय शिवाजी' म्हणत चढतो. मी दुर्ग लिंगाणा रात्री चढलो. मला अंधारात किल्ला चढताना खूप मजा आली…' हे सांगत होता अवघ्या पाच वर्षांचा शिवभक्त ज्येष्ठ माने.
ज्या वयात मुलं फक्त घरातच खेळतात. बाहेर गेलेच तर आई-बाबांचा हात सोडायचा नाही, हे शिकवलेल असतं. मात्र पुण्यात ज्येष्ठ हा पाच वर्षांचा शिवभक्त आहे. ज्याने वर्षभरात 25 किल्ले सर केले आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्याने चढाईसाठी सर्वांत अवघड वाटणारा रायगड जिल्ह्यालगत असणारा दुर्ग लिंगाणा सर केला आहे. ज्येष्ठ अतुल माने असे या पाच वर्षांच्या वीर शिवभक्त बालकाचे नाव आहे. त्याच्या आई ऋतुजा, वडील डॉ. अतुल माने, मोठी आठ वर्षांची बहीण अरुज्ञा 'पुढारी'च्या कार्यालयात आले. चुणचुणीत ज्येष्ठने आमच्याशी गप्पा मारल्या त्यावेळी छोट्या ज्येष्ठची मोठी गोष्ट समजली.
किल्ले रायगडाचा उपदुर्ग समजला जाणारा दुर्ग लिंगाणा हा चढाईसाठी सर्वांत अवघड किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3 हजार फूट उंच आहे. तो ज्येष्ठने दोनच दिवसांपूर्वी सर करण्याचा पराक्रम गाजवला आहे. हा गड चढताना मात्र माने कुटुंबाला ट्रेकिंग कंपनीची मदत घ्यावी लागली. हा किल्ला पहाटेच्या अंधारात सर केला आणि दिवस उजाडताच सकाळी सात वाजता तिरंगा घेऊन ज्येष्ठचा फोटो त्या आई- बाबांनी काढला.
पाच वर्षांच्या ज्येष्ठला किल्ल्यांची नावे तोंडपाठ आहेत. वर्षभरात सिंहगड, तोरणा, राजगड, रायगड, रोहिडा, तुंग, तिकोना, प्रतापगड, विसापूर, लोहगड, कोरिगड, पद्मदुर्ग, मल्हारगड, शिवनेरी, रायरेश्वर, केंजळगड, जीवधन, हडसर, अजिंक्यतारा, सज्जनगड, जंजिरा, कलावंतीण, लिंगाणा असे किल्ले त्याने सर केले आहेत. किल्ले राजगड चार मार्गांनी पाच वेळा, तर किल्ले सिंहगड तीनवेळा, पायवाटेने एकदा, पायरीमार्गे दोनवेळा सर केला आहे.
ज्येष्ठचे वडील डॉ. अतुल माने हे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत, तर आई ऋतुजा पगारिया माने इंटेरिअर डिझायनर आहेत. ऋतुजा व अतुल या दोघांनाही किल्ले पाहून छत्रपती शिवाजी महाराजांचा रोमांचक इतिहास जाणून घेण्याची आवड. त्यांनी मागच्या वर्षी लॉकडाऊन शिथिल होताच चार वर्षांचा ज्येष्ठ व सात वर्षांची अरुज्ञा यांना सिंहगड दाखवायचे ठरवले. ज्येष्ठ भराभर सिंहगड चढला तेव्हा काही ज्येष्ठांनी त्याला नमस्कार केला. म्हणाले, अहो काय चमत्कार आहे. याचे वय किती, याला दम लागत नाही का? तेथून मग ज्येष्ठने मागे वळून पाहिले नाही. एक एक गड सर करीत त्याने 25 किल्ले चढण्याचा पराक्रमच केला.