पुणे : पुढारी वृत्तसेवा
पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील दहशतवादी यासिन भटकळचे तत्कालीन वकील जहीरखान पठाण यांना इसिसने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत अॅड. पठाण यांनी सर्वोच्च न्यायालयचे सरन्यायाधीश, पंतप्रधान, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक, बार कौन्सिल ऑफ इंडिया, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, जिल्हा न्यायाधीश पुणे, पुणे बार असोसिएशन आणि पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना याबाबत लेखी अर्जाद्वारे तक्रार दिली आहे. तक्रार अर्जाद्वारे अॅड. पठाण यांनी संरक्षण देण्याची मागणी केली आहे. सध्या अॅड. पठाण जर्मन बेकरी प्रकरणात काम पाहत नाहीत.
अॅड. पठाण केलेल्या तक्रार अर्जानुसार, मुंबईतील एका व्यक्तीचा चेन्नईतील अॅड. पठाण यांचे आशील मोहम्मद दाऊद यांच्याबरोबर कोट्यवधी रूपयांचा आर्थिक व्यवहार झाला होता. या व्यवहारातून आर्थिक फसवणूकीचा गुन्हा खडक पोलिस ठाण्यात दाखल आहे. त्यातील दाऊद संशयीत आरोपी आहेत. दाऊद यांच्यातर्फे अॅड. पठाण कोर्टातील कामकाज पाहतात.
अॅड. पठाण या प्रकरणाच्या तडजोडीच्या निमित्ताने चेन्नई येथे गेले होते. तेथे असताना सचिन टेमघीरे याने संबंधीत व्यक्तीच्यावतीने येथून पुढे माझ्या ऐवजी मौलाना नावाचा माणूस बोलेल सांगितले. त्यानंतर मौलाना नावाच्या व्यक्तीने पठाण यांच्याशी संपर्क साधला. त्याने त्यांना मेसेज करून या प्रकरणातून तुम्ही बाहेर पडा, निघून जा, नाहीतर तुमच्या जीवाचे बरे वाईट करेल (युअर लाईफ इन डेन्जर माय पर्सन विल मिट यू) अशी धमकी दिली. तसेच त्याने त्यांना इसिसच्या नावाने धमकी देत इसिसचा माणूस असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केल्याचे अॅड. पठाण म्हणाले.
धमकी बाबतचा अर्ज आमच्याकडे आला असून पुढील कार्यवाहीसाठी पुढे पाठविण्यात आला आहे. कार्यवाही सुरू आहे.
– अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त पुणे.