नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : उपहार जळीतकांड (Uphaar tragedy case) प्रकरणातील प्रमुख आरोपी सुशील आणि गोपाळ अन्सल यांची सात वर्षांची शिक्षा निलंबित करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट शब्दांत नकार दिला. रियल इस्टेट प्रकरणातील एकेकाळचे दिग्गज असलेल्या अन्सल बंधुंवर उपहार प्रकरणातील पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा शाबित झालेला आहे.
गेल्यावर्षी सत्र न्यायालयाने अन्सल बंधुंसह पी. पी. बत्रा, अनूपसिंग कर्यावत आणि न्यायालयीन कर्मचारी दिनेशचंद शर्मा यांना शिक्षा सुनावली होती. (Uphaar tragedy case)
अपिल करेपर्यंत शिक्षा निलंबित करावी, अशी विनंती अन्सल बंधुंनी उच्च न्यायालयाकडे केली होती. तथापि न्यायमूर्ती सुब्रम्हण्यम प्रसाद यांनी ही याचिका फेटाळून लावली. अन्सल बंधुंवर असलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत आणि त्यांना दिलासा देणे म्हणजे गैर ठरेल, अशी टिप्पणी न्यायालयाने सुनावणीदरम्यान केली. दिल्ली पोलिस तसेच असोसिएशन ऑफ दी व्हिक्टीम्ज ऑफ उपहार ट्रॅजेडिजने (एव्हीयुटी) अन्सल बंधुंच्या जामिनाला विरोध केला होता. अन्सल बंधुंनी पुराव्याशी छेडछाड केल्याचा प्रकार जुलै 2002 मध्ये सर्वप्रथम उघडकीस आला होता. त्यानंतर न्यायालयात कार्यरत असलेल्या दिनेश शर्माची खात्याअंतर्गत चौकशी करण्यात आली. त्याचा सहभाग आढळल्यानंतर त्याला आधी निलंबित आणि नंतर सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.