पुणे : फॅशन स्ट्रीटचे पुन्हा फायर ऑडिट होणार

फॅशन स्ट्रीटमध्ये विक्रेत्यांनी स्टॉल उभारताना लेनमध्ये पुरेसे अंतर ठेवलेले नाही. त्यामुळे गल्ल्यांतून नागरिकांना चालताही येत नाही. (छाया : अनंत टोले)
फॅशन स्ट्रीटमध्ये विक्रेत्यांनी स्टॉल उभारताना लेनमध्ये पुरेसे अंतर ठेवलेले नाही. त्यामुळे गल्ल्यांतून नागरिकांना चालताही येत नाही. (छाया : अनंत टोले)

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महात्मा गांधी रस्त्यावरील कांबळे मैदानावरील फॅशन स्ट्रीटमध्ये विक्रेत्यांनी स्टॉल उभारले. मात्र, हे करत असताना त्यांनी सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली नाही. त्यामुळे आता प्रशासनाकडून पुन्हा एकदा फॅशन स्ट्रीटचे फायर ऑडिट केले जाणार आहे.
भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास नागरिक आणि विक्रेत्यांना मार्केटमधून बाहेर पडण्यासाठी मार्गच नाही. यासंदर्भात पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने सातत्याने विक्रेत्यांना सूचना केल्या आहेत.

मागील वर्षी मार्चमध्ये लागलेल्या आगीत सुमारे 600 दुकाने जळून खाक झाली. ही घटना रात्रीच्यावेळी झाल्याने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेनंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाने फायर ऑडिट केले आहे. त्यातून मार्केटमधील अग्निसुरक्षेतील त्रुटी असल्याचे समोर आल्या होत्या. त्यावर कॅन्टोन्मेंट बोर्डाने कार्यवाही करण्यापूर्वीच, विक्रेत्यांनी स्टॉल लावले आहेत. ते लावू नका, अशा सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सध्या मार्केट पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे.

खरेदीसाठी शेकडो नागरिक येत असतात. बाजारपेठेतील दुकाने एकमेकांच्या जवळ असून, त्यांच्यामध्ये पुरेशी जागा नाही. दुकानांच्या गल्ल्यांतून नागरिकांना चालताही येत नाही. काही फेरीवाल्यांनी प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याच्या गेटजवळील मोकळ्या जागेतही दुकाने थाटली आहेत. आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दल किंवा रुग्णवाहिका मार्केटमध्ये जाऊ शकत नाही, अशी स्थिती निर्माण होऊ शकते, असे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सूचनांकडे दुर्लक्ष

फॅशन स्ट्रीटला आग लागल्यानंतर ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करून त्याची पुन्हा उभारणी करणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे विक्रेत्यांनी दुर्लक्ष करून स्टॉल उभारले आहेत. यासंदर्भात बोर्डाने तीनवेळा जाहीर प्रगटन देऊन हे स्टॉल न उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु विक्रेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

फॅशन स्ट्रीटचे फायर ऑडिट करणे आवश्यक आहे. त्यासाठी एका संस्थेला नेमण्यात आले आहे. त्या संस्थेच्या अधिकार्‍यांनी फॅशन स्ट्रीटला भेट देऊन पाहणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार याठिकाणची काही दुकाने काढल्याशिवाय फायर ऑडिट करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बोर्डाच्या बैठकीत त्यावर निर्णय घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

– अमितकुमार, सीईओ, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news