मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र काँग्रेसने देशात कोरोना पसरवला या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मलबार येथील सागर या बंगल्यावर मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या परिसरात झाल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र थोड्याच वेळात सर्वसामान्यांना त्रास होत असल्याचे कारण देत काँग्रेसने आंदोलन थांबवले.
भाजप कार्यकर्त्यांनी रस्ते रोखून धरल्याने मुंबईकरांचे हाल झाल्याने आंदोलन थांबवत आहोत, अशी असे पटोले यांनी सांगितले.
फडणवीस यांच्या बंगल्यावर मोर्चा नेण्याचा निर्णय रविवारी काँग्रेसने जाहीर केला होता. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते सतर्क झाले होते. पोलिसांनीही परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. काँग्रेसच्या आंदोलनांना प्रतिकार करण्यासाठी आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंह आदी मंडळी कार्यकर्त्यांसह मैदानात उतरले हाेते. त्यांनी रस्त्यावर उतरून काँग्रेस विरोधात आंदोलन सुरू केले होते.
परंतु पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवल्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील संघर्ष टळला. काँग्रेसच्या आंदोलनामुळे मलबार हिल परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. जवळपास अर्धा तास वाहनचालकांची रखडपट्टी झाली होती. नाना पटोले एकाकी काँग्रेसच्या या आंदोलनात मुंबई काँग्रेसची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. काँग्रेसचा कोणताही मोठा नेता या आंदोलनात दिसला नाही. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे मलबार हिल परिसरात आले खरे, पण त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याउलट फडणवीस यांच्या समर्थनार्थ भाजपची नेते मंडळी मैदानात उतरली होती. मात्र त्यांनाही पोलिसांनी बाबूलनाथ परिसरात रोखून धरल्याने संघर्ष टळला.
हे ही वाचलं का