पुणे : पिस्तुलधाऱ्याला पोलिस अंमलदार केंगलेने झडप घालून पकडले | पुढारी

पुणे : पिस्तुलधाऱ्याला पोलिस अंमलदार केंगलेने झडप घालून पकडले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

चोरीच्या इराद्याने कोंढव्यातील सराफी दुकानात शिरुन गोळीबार करुन पळून जाणार्‍या चोरट्याच्या हातात पिस्तुल असतानाही आपल्या जीवाची पर्वा न करता कोंढवा पोलिस ठाण्याचे पोलीस अंमलदार अंकुश केंगले यांनी त्याला झडप घालून मोठ्या धाडसाने पकडले. गोळीबार करणाऱ्या सौद असिफ सय्यद (रा. फैजाना मस्जिदजवळ, मिठानगर, कोंढवा) याला अटक करण्यात आली आहे. ही घटना कोंढव्यातील आंबेडकर नगरमधील अरिहंत ज्वेलर्समध्ये गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. याप्रकरणी मुकेश ताराचंद गुगलिया (वय ५०, रा. सनफ्लॉवर सोसायटी, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.

कोण होणार करोडपती पुन्हा येणार

असा घडला थरार

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुगलिया यांचे कोंढव्यातील आंबेडकरनगर येथे अरिहंत ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. ते व त्यांचा कामगार शुभम हे दुकानात बसले होते. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सौद सय्यद व रुहान खान हे दोघे दुचाकीवरुन आले. त्यांनी दुकानदाराला बाहेर पडता येऊ नये, म्हणून दुकानाचे शटर बंद केले आणि गुगलिया यांच्याकडे पैसे व सोने काढून देण्याची मागणी करु लागले. गुगलिया यांनी ते न दिल्याने त्याने त्याच्याकडील पिस्तुलामधून एक गोळी झाडली.

अमोल पालेकर यांना कोरोनाची लागण, पण प्रकृती स्थिर

या गोळीचा आवाज ऐकून दुकानाबाहेर गर्दी जमली. तेव्हा दोघेही चोरटे आरडाओरडा करीत व पिस्तुलाचा धाक दाखवून पळून जाऊ लागले. त्याचे वेळी पोलीस अंमलदार अंकुश केंगले हे गस्त घालत तेथे येत होते. दुकानापासून काही मीटर अंतरावर चोरटे पळून चालले होते. अंकुश केंगले यांच्यासमोर सौद हा पिस्तुल घेऊन येत होता. तरीही न भिता त्यांनी झडप घालून त्याला पकडले. या गडबडीत त्याचा साथीदार पळून गेला. पोलिसांनी त्याचाही शोध सुरू केला आहे.

मंगळावर दिसला एलियन? छायाचित्र आले समोर

आरोपी बाबत आणखी माहिती घेण्याचे काम सुरू असून त्यांनी अशा प्रकारे किती जणांना लुटले याचीही चौकशी त्याच्याकडे सुरू आहे. या सर्व घटनेनंतर उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर व अन्य पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. अंकुश केंगले यांनी दाखविलेल्या धाडसाबद्दल त्यांचे कौतुक केले.

हिजाब वाद : रॅलीला परवानगी नाकारल्याने संताप

मेडीकल दुकानदारांना पोलिसांच्या सूचना

पिस्तूलाचा धाक दाखवून मेडिकल व्यावसायिकांना दुकानात शिरून लुटल्याचा घटना गेल्या काही दिवसांत वारंवार घडल्या होत्या. त्याअनुशंगाने गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी परिसरातील सर्व मेडिकल दुकानदारांची बैठक घेऊन योग्य ती खबरदारी घेण्याचा व तात्काळ पोलिसांना याबाबत काळविण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच पोलिसांना गस्त घालण्याचे आदेश दिले होते.

Covid-19 updates : कोरोना रुग्णसंख्येत घट, २४ तासांत ५८ हजार नवे रुग्ण, ६५७ जणांचा मृत्यू

आंबेडकर नगर परिसरात गस्त घालत जात असताना समोरुन आरडाओरडा करत दोन तीन मुले धावत येत असल्याचे दिसले. त्याचवेळी एकाच्या हातात पिस्तुल दिसले. पण मी पुढचा मागचा विचार न करता त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले. त्याच्या हातातील पिस्तुल काढून घेतले. त्यावेळी नागरिकांचा जीव आणि कर्तव्य बजावणे हे माझ्यासाठी महत्वाचे होते ते मी केले.
– अंकुश केंगले, पोलिस अंमलदार कोंढवा पोलिस ठाणे.

Back to top button