

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतीय सैन्य दलामध्ये भरती नर्सींग असीस्टंट पदावर एएफएमसी मध्ये कार्यरत असलेल्या जवानाने पत्नी व सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार वानवडी येथील एएफएमसी सैनिक अवास येथे घडला. याप्रकरणी पत्नीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरख नानाभाऊ शेलार (24, रा. सैनिक आवास, वानवडी) असे आत्महत्या करण्यात आलेल्याचे नाव आहे. आत्महत्येचा हा प्रकार 6 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडला. याप्रकरणी पत्नी अश्वीनी युवराज पाटील, युवराज पाटील, संगिता युवराज पाटील, योगेश युवराज पाटील, भाग्यश्री पाटील (सर्व रा. नंदुरबार) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत केशव नानाभाऊ पाटील (शेलार) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिस उपनिरीक्षक विशाल मोहिते यांनी सांगितले, फिर्यादी यांचे बंधू गोरख शेलार भारतीय सैन्य दलामध्ये भरती नर्सींग असीस्टंट पदववर कार्यरत होते. त्यांचे मागिल वर्षीच शेतकरी कुटुंबातील अश्विनी पाटील हिच्यासोबत लग्न झाले होते. गोरख यांची घरची परिस्थिती बेताचीच होती. लहान पणीच वडीलांचे निधन झाले होते. आईने आणि भावाने त्यांना कष्ट करून शिकवले. त्या जोरावर गोरख हे सैन दलात भरती झाले. परंतु, लग्न झाल्यानंतर त्यांचे पत्नीसोबत खटके उडू लागले.
अश्विनी ही गोरख यांना वारंवार मानसिक त्रास देत होती. तसेच त्यांना त्यांची नोकरी घालविण्याची धमकी देत होती. गर्भवती राहिल्यानंतर गर्भपात करण्याचीही ती धमकी देऊन तुझ्यावर आणि तुझ्या परिवारावर गुन्हा दाखल करण्याची धमकी गोरख यांना वारंवार दिली जात होती. येवढ्यावरही गोरख यांच्या सासरचे थांबले नाही. त्यांनी अश्विनीला सोडचिठ्ठी देण्यासाठी व 15 लाख देण्यासाठी वारंवार टॉर्चर केले. याच जाचाला कंटाळून शेवटी 6 फेब्रुवारी रोजी गोरख यांनी आत्महत्या केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल मोहिते करीत आहेत.