पिंपरी : संतोष शिंदे : कोरोनाच्या तिसर्या लाटेमध्ये सर्वसामान्य नागरिकांसह खाकीलाही मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला होता. मात्र, या वेळी पोलिसांनी वर्क फ्रॉम होम आणि ठाणेस्तरवर घेतलेल्या खबरदारीमुळे रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे.
तिसर्या लाटेत आत्तापर्यंत एकूण 272 पोलिस कोरोनमुक्त झाले आहेत. मंगळवारी (दि. 8) कोरोनाबाधित पोलिसांची संख्या केवळ दहा इतकी आहे.
सर्व रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने त्यांच्यावर गृहविलगीकरणातच उपचार सुरू होते. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात पहिल्या लाटेत 643, दुसर्या लाटेत 289 आणि तिसर्या लाटेत 282 पोलिसांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे.
कोरोनाशी सामना करताना एकूण पाच कर्मचार्यांना आत्तापर्यंत आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे तिसर्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन या वेळी पोलिसांनी जय्यत तयारी केली होती. ठाणेस्तरावर खबरदारीचे नियम पाळणे बंधनकारक केले होते.
मास्कशिवाय पोलिस ठाण्यात इंट्री बंद केल्याचाही या वेळी मोठा फायदा झाल्याचे दिसून आले. याव्यतिरिक्त पंचावन्न वयापेक्षा जास्त असलेल्या पोलिसांना वर्क फ्रॉम होम देण्यात आले. त्यामुळे या लाटेत जीवितहानी झाली नाही.
या वेळी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कोरोनाबाधित पोलिसांची सर्व व्यवस्था करण्याची जबाबदारी पोलिस कल्याण शाखेच्या वरिष्ठ निरीक्षकांवर दिली होती.
यामध्ये संसर्गाची लक्षणे दिसणार्या पोलिसांचा दररोज आढावा घेणे, बाधित पोलिसांना योग्य उपचार दिली जाते का याची शहानिशा करणे, कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्यांना मास्क, सॅनिटायझर प्रोटेक्शन किट पुरवणे अशी कामे सोपवण्यात आली आहेत.
त्यामुळे खात्यातील उच्चपदस्थांनादेखील कोरोना रुग्णांची माहिती दररोज मिळत होती.याव्यतिरिक्त आयुक्तालयातील बाधित पोलिसांसाठी एक स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांची गैरसोय झाली नाही.
त्यांना तत्काळ मदत मिळाली. शहरातील तीन खासगी रुग्णालय पोलिसांसाठी उपलब्ध करून दिल्याने उपचारात हलगर्जीपणा किंवा दिरंगाई झाली नाही.
दोन लाटांच्या अनुभवाचा फायदा
कोरोनाच्या मागील दोन लाटांमुळे कोरोनाशी दोन हात करण्याचा अनुभव होता. नेमकी कशा प्रक्रारे खबरदारी घेतली पाहिजे, याचाही अंदाज होता. त्यामुळे यावेळी वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार खबरदारी जास्त प्रमाणात घेण्यात आली. रुग्णांना झटपट उपचार मिळाल्याने कोरोना मुक्त होण्याची टक्केवारी जास्त राहिली. परिणामी आता रुग्णसंख्या आटोक्यात आहे.
– सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, प्रशासन, पिंपरी- चिंचवड