पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांसमोर मोठे आव्हान

Crime Story
Crime Story
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहरातील उपनगरांत गुन्हेगारी फोफावली असून, किरकोळ वादातून सामान्यांच्या वाहनांची तोडफोड, दहशत माजविण्याचे प्रकार, गोळीबार, प्राणघातक हल्ला, जबरी चोरीच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. पोलिसांकडून सराइत गुंड टोळ्यांवर होत असलेल्या मोक्का तसेच झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाईमुळे काहीसा चाप बसला असला, तरी उपनगरातील वाढती गुन्हेगारी पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे.

काळ्या धंद्यातील रसद, पडद्याआड मिळणारा आश्रय आणि स्थानिक पोलिस ठाण्याचे आर्थिक हितसंबंध हे उपनगरांतील वाढत्या गुन्हेगारीचे मूळ असल्याचे दिसून येते. मागील वर्षी पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीतील परिमंडळ पाच व चारच्या हद्दीत सर्वाधिक गुन्हे दाखल झाल्याची नोंद आहे. खून, खुनाचा प्रयत्न, घरफोड्या, जबरी चोरी, गर्दीत मारामारी, दुखापत, वाहनचोरी, विनयभंग, फसवणूक, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे. परिमंडळ पाचच्या हद्दीत भाग एक ते पाचचे 2 हजार 724 गुन्हे दाखल आहेत. तर भाग सहाचे 4 हजार 95 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो परिमंडळ चारचा. चारच्या हद्दीत भाग एक ते पाचचे 2 हजार 61 गुन्हे दाखल झाले असून, भाग सहाचे 3 हजार 37 गुन्हे दाखल आहेत.

घरफोड्या, वाहनचोरी अशा सराईत गुन्हेगारांनी मागील काही दिवसांपासून उपनगरात बस्तान बसविले आहे. अनेकदा कारागृहातून बाहेर आल्यानंतर हे सराईत गुन्हेगारी कृत्य करत राहतात. प्रतिस्पर्धी सराईतांमध्ये एकमेकांविषयी सुडाची भावना वाढीस लागल्यामुळे उपनगरात घातक शस्त्रांचे पेव फुटले आहे. अल्पवयीन मुले एकमेकांच्या वादातून गावठी कट्ट्यांचे बार काढत आहेत.

Akadewari
Akadewari

म्हणून सराइतांचा मोर्चा उपनगरात

रोजगाराच्या निमित्ताने राज्यासह परराज्यांतील नागरिक मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले. मात्र, शहरातील मुख्य भागातील वास्तव्य आर्थिकदृष्या खर्चीक असल्यामुळे अनेकांनी उपनगरात आपले बस्तान बसवले. यामुळे उपनगरांनी अक्राळविक्राळ रूप धारण केले. त्यामुळे अनेक सराइतांनी आपला मोर्चा या भागाकडे वळवत आपण कसे येथील भाई आहोत, हे दाखवण्यासाठी गुन्हेगारी कृत्य करण्यास सुरुवात केली. यातूनच खून, दरोडा, खंडणी, जबरी चोरी, मारामारी, दहशत निर्माण करण्यासाठी वाहनांची तोडफोड करणे असे गंभीर प्रकार घडू लागले आहेत.

वारंवार दहशतीच्या घटना

चालू वर्षात बिबवेवाडीत दहशतीच्या वारंवार घटना घडल्या आहेत. त्यामध्ये गाड्यांची तोडफोड, खुनाच्या व खुनाच्या प्रयत्नाच्या घटना, हत्यारे हातात घेऊन दहशत माजविणारे टोळके आणि त्याबरोबर गोळीबाराची झालेली घटना, अशा घटनांचा समावेश आहे. सामान्य नागरिकांना दहशतीच्या सावटाखाली ठेवणार्‍या या घटनांना ब—ेक केव्हा लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ताजी घटना : हडपसर येथे तरुणाचा खून

टोळक्याने धारदार हत्याराने तरुणाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. हडपसर येथील गंगानगरमधील माउली कॉलनीशेजारील गल्ली नंबर 9 च्या महेश लाँड्रीजवळ हा प्रकार उघडकीस आला. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असून, मारेकर्‍यांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. गणेश महापुरे (वय 25, रा. हडपसर ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रात्री हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापुरेचे फुरसुंगीमधील गंगानगर भागात लॉन्ड्रीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे तो दुकानात काम करीत होता. साधारणतः सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोयते घेतलेले टोळके त्या ठिकाणी आले. त्यांनी दुकानात घुसून गणेशवर कोयत्याने सपासप वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर टोळके पसार झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news