

मंचर; पुढारी वृत्तसेवा : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील प्राचीन काळापासून सुरू असलेल्या मडक्यांच्या यात्रेत आता मडकीच विक्रीस येत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. मडक्यांच्या या यात्रेत मडकी कालबाह्य होऊन तेथे खेळणी, भेळवाले यांच्या दुकानांची लगबग बुधवारी (दि. 2) सायंकाळी दिसून आली. अवसरी बुद्रुक येथे यात्रेनिमित्त पुणे, खेड, चाकण, जुन्नर, नारायणगाव, मंचर, शिरूर, पाबळ या परिसरातून ग्राहक खास पाण्याचे माठ आणि रांजण घेण्यासाठी येत होते. तंत्रज्ञानाच्या युगात माठाची जागा आता फ्रिजने घेतली आहे. त्यामुळे सालाबादप्रमाणे होणाऱ्या या यात्रेत आता माठ विक्रीसाठी येत नाहीत. (पुणे मडक्यांची यात्रा)
सध्या श्यामकांत चव्हाण, शंकर चव्हाण, पांडुरंग चव्हाण, पाबळकर, काळे आणि थोडेफार कारागीर पाण्याचे माठ बनविण्याचे काम करतात. पुणे-मुंबई या ठिकाणाहून या कारागिरांच्या माठांना मागणी असते. काही लोक पाण्यासाठी माठ वापरतात. पण, सध्या लाल रंगाचे माठ घेण्याकडे ओढा जास्त आहे. या यात्रेत 2004 मध्ये माठ विक्रीसाठी आले हाोते. त्यानंतर यात्रेत माठ विक्रीसाठी येण्याचे बंद झाले आहे. ही यात्रा सालाबादप्रमाणे भरते. पण, नवीन पिढीला सांगावे लागते की, ही मडक्यांची यात्रा म्हणून प्रसिद्ध होती. अवसरी बुद्रुकचे ग्रामस्थ, कुंभार समाज, धर्मराज मित्रमंडळ यांनी पुढाकार घेतला, तर एकेकाळचे वैभव असलेल्या या यात्रेत पुन्हा माठाची विक्री हाोऊ शकते व अवसरीचा इतिहास पुन्हा जिवंत होऊ शकतो. (पुणे मडक्यांची यात्रा)
अवसरी येथील कुंभार समाजाकडे पाण्याचे माठ तयार करण्याच्या व्यवसायाची-मोठी परंपरा आहे. दत्तात्रय चव्हाण, वालू चव्हाण, जिजाबाई चव्हाण, मधू चव्हाण, सुंदर चव्हाण हे पूर्वीच्या काळी चार महिने माठ, रांजण, कुंड्या बनवत होते. फिरत्या चाकावर मातीला आकार देऊन सुरेख माठ तयार करण्याची त्यांची परंपरा होती. याची दखल 28 ते 30 वर्षांपूर्वी दूरदर्शनने देखील घेतली होती. त्यावेळी दत्तात्रय चव्हाण यांच्यावर दूरदर्शनने स्पेशल रिपोर्ट केला होता. यामुळे आधीच प्रसिद्ध असलेले अवसरीचे पाण्याचे माठ आणखी प्रसिद्ध झाले. (पुणे मडक्यांची यात्रा)
अवसरीची मडक्याची यात्रा गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून मडकी विक्रीसाठी काेणीही येत नाहीत. त्यामुळेही मडक्याची यात्रा आता नावापुरतीच राहिली आहे. याचे जतन करण्यासाठी कुंभार समाजातील युवकांनी प्रयत्न करून 'ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर केवळ मडक्यांची यात्रा हे नाव जतन करण्यासाठी प्रयत्न केले तर आमच्या पिढीचे सार्थक होईल.
– मनोहर सोमवंशी, विभागीय अध्यक्ष, कुंभार समाज
हेही वाचलतं क?