परीक्षांमध्‍ये गैरव्यवहार : आता संशयितांवर हाेणार ‘लाचलुचपत’ची ही कारवाई | पुढारी

परीक्षांमध्‍ये गैरव्यवहार : आता संशयितांवर हाेणार 'लाचलुचपत'ची ही कारवाई

पुढारी वृत्तसेवा : आरोग्य विभाग, म्हाडा आणि टीईटी परीक्षांमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता मिळून आली आहे. त्यांनी ही मालमत्ता आपल्या सरकारी पदाचा गैरवापर करुन मिळविली असल्याने त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलम जोडण्यात येणार आहे. त्यादृष्टीने वरिष्ठ पोलीस अधिकारी माहिती घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

म्हाडा आणि टीईटी परीक्षांमध्ये गैरव्यवहार (Exam Scam)

उपसचिव, आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी यापासून शिक्षक, लीपिक, शिपाई अशा अनेकांना गैरव्यवहारप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह या संपूर्ण प्रकरणात ३० हून अधिक जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात काम केलेल्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, या अधिकार्‍यांनी आपल्या पदाचा दुरउपयोग करुन ही मालमत्ता (Exam Scam) जमविली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधाचे कलम लावणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगली असल्याचे दिसून आले. त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्याची आवश्यकता आहे. असे अधिकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला आहेत. त्यासाठी सायबर पोलिसांनी केलेला पंचनामा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी सोपवावे लागेल.

उपसचिव सुशील खोडवेकर, तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे, सल्लागार अभिषेक सावरीकर, आरोग्य विभागाचे सहसंचालक महेश बोटले, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप जोगदंड, मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे, क्लार्क राजेंद्र सानप , उद्धव नागरगोजे अशा अनेक सरकारी अधिकार्‍यांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन आरोग्य विभागाच्या परीक्षांचे क व ड गटाचे पेपर फोडले. (Exam Scam) तसेच टीईटी परीक्षांमध्ये गैरमार्गाचा वापर करुन पैसे घेऊन अपात्र परीक्षार्थींना पात्र ठरवले. या आरोपींवर सध्या फसवणूक, कटकारस्थान तसेच महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणार्‍या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियमाचे कलम लावण्यात आले आहे. त्यांना आपल्या सरकारी पदाचा गैरवापर केल्याने त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलम १३ हे वाढविण्यात येणार आहे.

हेही वाचलतं का? 

Back to top button