जखमी बिबट्याला जीवदान; मेंढपाळांनी सोडला सुटकेचा निःश्वास | पुढारी

जखमी बिबट्याला जीवदान; मेंढपाळांनी सोडला सुटकेचा निःश्वास

ओतूर; पुढारी वृत्तसेवा : खामुंडी (ता. जुन्नर) येथील खामुंडी ते बदगी बेलापूर रस्त्याच्या परीसरातील रवींद्र डोंगरे या शेतकऱ्याच्या शेतजमिनीजवळ खोल ओढ्यात अंदाजे  बिबट्याची मादी जखमी अवस्थेत असल्याची माहिती त्यांचा मुलगा सागर डोंगरे यांनी कैलास बोडके यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली.

ओतूर वनविभागाचे वनरक्षक अतुल वाघुले यांना संपर्क करून हकीकत सांगितली. तातडीने जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अभिषेक भिसे व ओतूर वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुधाकर गिते, वनरक्षक किसन केदार, पी. के. खोकले, कि. एफ. खरोडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन खोल ओढ्यातील झाडाझुडपात पडलेल्या जखमी बिबट्याच्या मादीला रेस्कू करून ताब्यात घेतले. यानंतर उपचारासाठी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात पाठविले.

डॉ. निखिल बनगर हे जखमी बिबट्याच्या मादीवर उपचार करत असल्याची माहिती सुधाकर गीते यांनी दिली.  बिबट्याची मादी भक्षाच्या शोधात रात्रीच्या वेळी खोल ओढ्यात पडली असून जखमी झाली असल्याची शक्यता देखील वनविभागाने वर्तवली आहे. विशेष म्हणजे या बिबट्याची मादी ज्या ठिकाणी जखमी होऊन ओढ्यात पडली होती, त्याच अगदीच काहीशा अंतरावर मेंढपाळ आपल्या मेंढरांसह वास्तव्यास असल्याने ते भयभीत झाले होते; मात्र या बिबट्याच्या मादीला वनविभागाने ताब्यात घेतल्याने मेंढपाळानी सुटकेचा नि :श्वास सोडला आहे. या खोल ओढ्यातील झाडाझूडपात पडलेल्या जखमी बिबट्याच्या मादीला कैलास बोडके व वनविभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सतर्कतेमुळे जीवदान देण्यात यश मिळाले.

हेही वाचलत का? 

Back to top button