बीड : ऊस तोडणीच्या पैशावरून एकाचे अपहरण; काेल्‍हापूरच्‍या दाेघांसह चौघांवर गुन्हा दाखल | पुढारी

बीड : ऊस तोडणीच्या पैशावरून एकाचे अपहरण; काेल्‍हापूरच्‍या दाेघांसह चौघांवर गुन्हा दाखल

केज, पुढारी वृत्तसेवा

ऊस तोडणीसाठी पाच लाख रु. घेऊनही मजूर न पाठविल्याने केज तालुक्यातील ढाकेफळ येथे एकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ करून त्याचे अपहरण केल्याची घटना घडली. याप्रकरणी अपहरण झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध अपहरण व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, २८ जानेवारी रोजी सकाळी १० : ०० वाजण्याच्या सुमारास युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीतील ढाकेफळ ( ता. केज ) येथे उदय पाटील, स्वप्नील पाटील आणि त्यांचे सोबतचे इतर दोघे यांनी पांडुरंग घाडगे यांना ऊस तोडणीसाठी पाच लाख रु. घेऊनही ऊस तोडणीसाठी मजूर का पाठविले नाही? असे म्हणून लाथा-बुक्क्याने मारहाण केली. तसेच स्वप्नील पाटील याने जातीवाचक बोलून अश्लील भाषेत शिवीगाळ करत पांडुरंग घाडगे याला त्यांच्या गाडीत बसवून अपहरण केले. जोपर्यंत पैसे परत देत नाही; तोपर्यंत  सोडणार नाही, अशी धमकी दिली.

या घटनेनंतर घाडगे यांची पत्नी मैनाबाई घाडगे हिने दि. २९ जानेवारी रोजी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात  तक्रार दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांनी  या प्रकरणी उदय पाटील, स्वप्नील पाटील ( दोघे. रा. कावणे ता. करवीर जि. कोल्हापूर ) इतर दोघे अशा चार जणांच्या विरुद्ध गु.र.नं. २१/२०२२ भा.दं.वि. ३६५, ३२३, ५०४, ५०६, ३४ आणि अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायदा ३ (१)(आर)(एस) नुसार अपहरण, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी व ॲट्रॉसिटी या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस अधिकारी पंकज कुमावत हे करीत आहेत.

हेही वाचलं का? 

Back to top button