ग्राऊंड रिपोर्ट | मोखाड्यातील ११ हजार आदिवासींच्या हाती सौर’शक्ती’, पाण्यासाठीची पायपीट थांबली

ग्राऊंड रिपोर्ट | मोखाड्यातील ११ हजार आदिवासींच्या हाती सौर’शक्ती’, पाण्यासाठीची पायपीट थांबली

पुढारी ऑनलाईन डेस्क : जानेवारी संपला की मोखाड्यातील आदिवासी पाड्यांवर महिलांच्या पोटात खड्डा पडतो. पाणी मिळवण्यासाठी या आदिवासी महिलांना पुढे जून महिन्यांपर्यंत दररोज पायपीट करायची असते. डोक्यावर दोन हंडी, हातात पाण्याचा कॅन घेऊन रणरणत्या उन्हाता चालत फिरणाऱ्या महिला हे चित्र या परिसरात आता सवयीचे झालेले आहे. पाण्यासाठी पायपीट ही आदिवासी महिलांच्या पाचवीला पूजलेली समस्या, आणि या समस्येच्या आधाराने वाढलेल्या इतर अडचणींसोबत आदिवासी महिला पदर खोचून संघर्ष करताना दिसतात.

आदिवासी वाड्या, लहान पाडे यापासून विहीर, झरे, नदी असे पाण्याचे स्रोत सर्वसाधारण २ ते ४ किलोमीटर तरी लांब असतात. एका महिलेला जर दिवसाला ५ वेळा पाणी भरायला गेलीतर जाऊन येऊन या फेऱ्या होतात १० म्हणजे रोज पाण्याची हंडी घेऊन किमान २० ते ४० किलोमीटरची पायपीट या महिलांना चुकत नाही.

पण समजा हेच पाणी जर वाडीवर आले तर? अगदी लहान वाटणारा हा बदल या वाडीवर क्रांतीपेक्षा कमी नसतो. पालघर जिल्ह्यातील मोखाडा आणि जव्हार येथे 38 वाड्यांवर ग्रामस्थ आणि समाजिक संस्था आरहोन यांनी एकत्र येत पाण्याच्या छोट्या पण प्रभावी योजना साकारल्या आहेत. दारात आलेल्या पाण्यामुळे या वाड्यांवर महिला सबलीकरणाचे एक पाऊल पुढे पडत आहे. या योजनांचा फायदा येथील ११ हजारांवर ग्रामस्थांना होऊ लागला आहे.

डोक्यावरील हंडा खाली उतरला!

यातील एक वाडी म्हणजे म्हणजे राजकोट पाडा. सौरऊर्जेच्या मदतीने दोन वर्षांपूर्वी ४२ कुटुंबाच्या या वाडीवर पाणी आलेले आहे. ही वाडी थोड्या उंचावर आहे, तर पाण्यासाठीची विहीर खाली उतरावर आहे. सौरपंपाच्या मदतीने विहिरीतील पाणी वाडीवर आणले जाते. हे पाणी उंचावरील एका टाकीत पडते. या टाकीतून हे पाणी सायफन पद्धतीच्या फिल्टरमधून स्वच्छ केले जाते आणि तेथून खाली ठेवलेल्या एका टाकीत हे पाणी येते. हे पाणी गावकऱ्यांना दिवसभर उपलब्ध राहाते. या योजनेतून आणखी एक कनेक्शन काढण्यात आले असून ते पाणी फिल्टर न करता खर्चासाठी वापरले जाते.

दारात पाणी आल्यामुळे ललीता मुकाणे आनंदी आहेत. वेळ वाचत असल्याने त्या आता मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊ शकतात. त्या म्हणाल्या, "पूर्वी सगळाच दिवस पाणी भरण्यासाठी जायचा. भर उन्हात दिवसभर पायपीट करून पाणी भरावे लागायचे, त्यामुळे तब्येतही बिघडायची. आता पाणी भरण्याचे काम अर्ध्या तासात पूर्ण होते. उरलेला वेळ मुलांचा अभ्यास घेणे, आणि इतर काही कामासाठी वापरता येतो."

या गावात आता 'राहा' या संस्थेने आता एक हातमाग उपलब्ध करून दिला आहे. याचा वापर करून महिला जमखाने बनवतात, आणि त्यातून महिलांना रोजगारही उपलब्ध होत आहे.

गेल्या वर्षीपासून डोक्यावरील हंडा खाली उतरल्याचे, प्रभावती हुंबे सांगतात. "विहीर आमच्या घरापासून फार दूरवर आहे. पिण्याचे पाणी, गुरांसाठी पाणी, त्यानंतर कपडे धुण्यासाठी पाणी असा बराचे वेळ जायचा, आता मात्र यातून सुटका झाली आहे. आता आम्ही मुलांच्या अभ्यासात लक्ष घालू शकतो."

मोखाड्यातील ३६ आदिवासी वाड्यांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून पाणी पुरवले जाते. तसेच शेतासाठी सिंचनाच्या व्यवस्थाही करण्यात आल्या आहेत.
मोखाड्यातील ३६ आदिवासी वाड्यांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून पाणी पुरवले जाते. तसेच शेतासाठी सिंचनाच्या व्यवस्थाही करण्यात आल्या आहेत.

आरोहन या संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक नितेश मुकाणे म्हणाले, "२००६ ते २००९ या काळात आम्ही पाणी आणि कुपोषण या दोन विषयांवर काम सुरू केले. भूमिगत बंधारे, विहिरींची कामे, नव्या विहिरी बांधणे, जुन्या विहिरींची दुरुस्ती अशी कामे हाती घेतली. काही वर्षांपासून आम्ही सौरऊर्जेचा वापर करून पाण्याच्या योजना सुरू करत आहोत. सुरुवातीला पाच वाड्यांवर ही कामे झाली."

त्या-त्या वाडीची गरज ओळखून पाण्याच्या योजना राबवल्या तर त्यांचा गावकऱ्यांना फार चांगला फायदा होतो, असे मुकाणे यांचे निरीक्षण आहे. "एखादी योजना यशस्वी व्हायची असली तरी शेवटी ग्रामस्थांनी त्याची 'मालकी' स्वीकारावी लागते. आम्ही ज्या वाड्यांवर सौरऊर्जेने पाणी पोहचवले आहे, तेथील उपकरणांची दुरुस्ती, देखभाल आता ग्रामस्थ स्वतःच करतात, " असे ते म्हणाले.

दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून सुटका

पिण्याच्या पाण्यासाठी ज्या योजना केल्या आहेत, त्या सर्वांना सायफनवर आधारित फिल्टर बसवले आहेत. त्यामुळे स्वच्छ पिण्याचे पाणी ग्रामस्थांना उपलब्ध झाले आहे. पूर्वी दूषित पाण्यामुळे जे आजार होत होते, ते आता बऱ्याच अंशी कमी आल्याचे येथील महिला सांगतात. तसेच या योजना साकारण्यापूर्वी उन्हाळ्यात महिलांना दूर चालत जाऊन पाणी भरावे लागे. शिवाय कपडे धुणे, गुरांसाठीचे पाणी यासाठीही पायपीट ठरलेली असायची, यातून महिलांना आता चांगला दिलासा मिळाला आहे.

सौरऊर्जेच्या माध्यमातून पाणी वाडीवर नेल्यानंतर ते सायफन फिल्चटरने स्वच्छ केले जाते.
सौरऊर्जेच्या माध्यमातून पाणी वाडीवर नेल्यानंतर ते सायफन फिल्चटरने स्वच्छ केले जाते.

दुरुस्तीची जबाबदारी ग्रामस्थांची

सौरऊर्जेवर पाण्याची योजना साकारण्याचे काही फायदे आहेत. २५ वर्ष सौरपॅनल कार्यरत राहातात आणि त्यांची देखभाल दुरुस्तीसाठी फार काही खर्च येत नाही, आणि ऊर्जेचा खर्च शून्य असतो आणि ऊर्जेसाठी कोणावर अवलंबून राहावे लागत नाही.

सौरपंप, त्यावरील मोटीर, वायरिंग यांच्यासंदर्भातील लहानमोठी दुरुस्ती लोक स्वतःच करतात असे मुकाणे यांनी सांगितले. "लोकांना या योजना स्वतःच्या मालकीच्या वाटल्या पाहिजेत हेच महत्त्वाचे असते. पूर्वी सौरपंपाच्या वायर चोरीला जाण्याच्या घटना सतत घडत, त्या ग्रामस्थांनी स्वखर्चाने बदलल्या. आताही मोटर किंवा इतर काही दुरुस्ती असेल तर ग्रामस्था स्वतः खर्च करण्यासाठी पुढे येतात," असे प्रोजेक्ट ऑफिसर गणेश सरोदे यांनी सांगितले.

शेतीसाठीही पाणी

सिंचन सुविधा नसल्याने या परिसरात फक्त पावसात शेती होते. सौरऊर्जेचा वापर करून ही समस्या सोडवण्याचा आरोहन आणि ग्रामस्थ करत आहेत. यातून आतापर्यंत २१ वाड्यांवर सौरऊर्जेच्या मदतीने शेतीसाठी बारामाही पाण्याची योजना राबवली आहे आणि याचा लाभ ४६४ शेतकऱ्यांना होत आहे. दिद्देवाडीत १२ कुटुंबासाठी सौरऊर्जेवरील सिंचन योजना सकारली आहे. येथील शेतकरी अरुणा पाटील म्हणाल्या.

बारामाही शेती शक्य झाली

पावसात या परिसरात भात, नागली, वरी ही मुख्य पिके असतात. अल्पभूधारक शेतकरी वरी वगळता इतर पिके घरच्या वापरतासाठी ठेवतात. ज्या ठिकाणी सौरपंपातून बारमाही पाण्याची सोय झालेली आहे, तेथे आता मोगरा, काजू, भुईमूग, भाजीपाला अशी पिके घेता येणे शक्य झालेले आहे, आणि ही सर्व नगदी पिके आहेत.

मोखाड्यातील ८० टक्के शेतकरी अल्पभूधाकर शेतकरी आहेत. पावसात येथे फक्त भात, नागली, वरई अशी शेती शक्य होते. जे शेतकरी फक्त पावसात भातशेती करतात त्यांचे वार्षिक उत्पन्न २० ते २५ हजार रुपयांच्या वर जात नाही. त्यातही बरेच शेतकरी भात, नागली अशी पिके घरगुती वापरासाठी ठेवतात. पण मोगरा शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वर्षाला १ लाखापर्यंत तर भाजीपाला घेणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक ५० हजार रुपये अधिकचे उत्पन्न मिळू लागले आहे. "नैसर्गिक कारणे, बाजारातील स्थिती यामुळे एखादे पीक हातातून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आम्ही मिश्र पिकांवर भर देतो," असे मुकाणे म्हणाले. 

जलस्रोतांवर काम आवश्यक

सौरऊर्जेच्या मदतीने पाण्याची योजना करताना जलस्रोत असावे लागतात. आरोहनने कामाची सुरुवात करताना जलसंवर्धनाची कामे हाती घेतली, त्यामुळेच सौरऊर्जेच्या माध्यमातून पाणीयोजना राबवणे शक्य झाले, असे प्रोजेक्ट ऑफिसर गणेश सरोदे यांचे मत आहे.

विकेंद्रित ऊर्जानिर्मितीसाठी सौरऊर्जा सर्वोत्तम

एका घरासाठी किंवा अगदी एखाद्या मोठ्या शहरासाठी वीजनिर्मिती करायची असेल तर सौरऊर्जा सर्वोत्तम ठरते, असे प्रयास संस्थेचे फेलो अश्विन गंभीर यांनी सांगितले. प्रयास ही संस्था अपारंपरिक ऊर्जेसंदर्भात कार्यरत आहे. गंभीर म्हणाले, "भारतात सौरप्रकाशाची उपलब्धता फार चांगली आहे. सौरपॅनलची संख्या वाढवू तिवढी ऊर्जानिर्मिती वाढवता येते. एखादी दुर्गम वस्ती असेल आणि तेथे वीज पोहोचवता येत नसेल तर सौरऊर्जेच्या मदतीने त्या वस्तीसाठी वीज उपलब्ध करता येते."

बऱ्याच ठिकाणी ऊर्जा साठवून ठेवायची गरज भासू शकते, अशा वेळी बॅटरी स्टोरेजचा खर्च अधिक होऊ शकतो. पण शेतीसाठी पाणीपुरवठा, पिण्यासाठी पाण्याची योजना यात वीज साठवण्याची गरज भासत नाही, त्यामुळे अशा प्रकल्पांत सौरऊर्जा फार प्रभावी ठरते. शिवाय शेतीला पाणी पुरवठ्यासाठी दिवसा वीज पुरवठा, अल्प खर्चात करता येऊ शकतो, असे गंभीर म्हणाले. गेल्या काही वर्षांत सौरऊर्जा निर्मितीचा खर्चही कमी येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news