

कासा : शेतकरी, शेतमजूर व आदिवासी समाजाच्या विविध ज्वलंत मागण्यांसाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) ठाणे-पालघर जिल्हा कमिटीच्या वतीने आज चारोटी ते पालघर असा भव्य पायी लाँग मार्च सोमवारी काढण्यात आला. डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार कॉ. विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या ‘लाल वादळा’त हजारो कार्यकर्ते सहभागी झाले असून हा मोर्चा थेट पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी धडकणार आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी येथून दुपारी 2 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामुळे दुपारनंतर काही काळ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूर्वेकडील गुजरात -मुंबई वाहिनी वरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक तसेच वयोवृद्ध मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
विविध मागण्यांचा एल्गार असून या लाँग मार्चमधून जल, जंगल व जमीन हक्क, रोजगार हमी योजनेअंतर्गत किमान 600 रुपये रोज मजुरी व 200 दिवस कामाची हमी, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरणे, स्वस्त धान्य 35 किलोपर्यंत देणे, पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, पालघर जिल्ह्यातील बहुचर्चित वाढवण व मुरबे बंदर प्रकल्प रद्द करणे, जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा, महावितरणचे स्मार्ट वीज मीटर रद्द करणे आदी प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.मोर्चा निघण्यापूर्वी आमदार कॉ. विनोद निकोले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. अशोक ढवळे व किसान सभेचे नेते कॉ. अजित नवले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
“जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. असेही यावेळी सांगण्यात आले. हा मोर्चा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी असल्याने अनेक शेतकरी बैलगाडी व नांगर घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. महिलांचा सहभाग लक्षणीय होता. पालघर जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा हा विक्रमी पायी मोर्चा ठरला. पालघर, तलासरी, डहाणू, विक्रमगड, मोखाडा, वाडा तसेच ठाणे जिल्ह्यातील नेते व कार्यकर्ते मिळून अंदाजे 15 ते 20 हजारांपर्यंत आंदोलक सहभागी झाल्याची माहिती देण्यात आली.या मोर्चाचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. अशोक ढवळे, मरियम ढवळे, आमदार कॉ. विनोद निकोले, किसान सभेचे नेते कॉ. अजित नवले, कॉ. चंद्रकांत गोरखना,यांच्यासह आदी करत होते.
मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस अधिकारी व कर्मचारी मिळून 800 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका, अग्निशामक दल व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आज मासवण, उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा संध्याकाळी हा मोर्चा पालघर रोडवरील मासवण परिसरात मुक्कामी थांबणार असून उद्या पुन्हा पायी चालत जाऊन आपल्या विविध मागण्यांसाठी थेट पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडक देणार आहे.