

वसई : अनिलराज रोकडे
राज्यभर महापालिका निवडणुकांमध्ये भाजपचा डंका वाजत असताना, त्यांना 43 जागांच्या मर्यादेत ठेवून वसई विरारवर निर्विवाद वर्चस्वाची हॅट्रिक साधत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. असे असले, तरी मावळत्या महापालिकेतील त्यांचे संख्याबळ 106 वरून घटून 66 वर आल्याचे विसरून चालणार नाही. तसेच भाजपचे असलेले एका नगरसेवकाचे बलाबल यावेळी वाढून तब्बल 43 होऊन पक्षाची ताकद वाढली असली, तरी असलेली संधी आणि लावलेल्या ताकदीच्या तुलनेत मोठा पल्ला त्यांना गाठता आलेला नाही. वरकरणी बविआ आणि भाजप असा दोघांनीही निवडणुकीच्या निकालानंतर आप-आपले समाधान करून घेत, विजयाचा गुलाल उधळला असला, तरी दोघांनाही जमिनीवर आणण्याचे आणि ठेवण्याचे काम सामान्य वसईकरांनी चाणाक्षपणे या निवडणुकीतून केलेले दिसून येते.
वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महापालिका क्षेत्रातील विधानसभेच्या तीनही जागा महायुतीला देणाऱ्या वसईकरांनी अल्पकाळातच मतपरिवर्तन करीत महापालिकेच्या चाव्या मात्र बविआच्या ताब्यात दिल्या आहेत. अर्थात, विधानसभा आणि महापालिका असे येथील सत्तेचे विभाजन करून मतदारांनी प्रगल्भतेचे दर्शन घडविले आहे. यामुळे भाजप आणि बविआ या सत्ताधारी उभयतांना आता जनसामान्याला गृहीत धरता येणार नसून, त्यांचे प्रश्न आणि अडीअडचणीबाबत अधिक सजग आणि संवेदनशील राहावे लागणार आहे, तसेच भाजपच्या साथीने शिवसेनेचा (शिंदे) एक, बविआच्या साथीने काँग्रेसचे चार आणि मनसेचा एक नगरसेवक महापालिकेत नव्याने पाठवून लोकशाहीत महत्त्व असलेल्या बहुपक्षीय राज्यकारभाराची संधी नव्या तीन पक्षांना देण्याची आणखी दुसरी करामत मतदारांनी केली आहे. असाच साधा आणि सोपा या निवडणूक निकालांचा अर्थ लावता येईल!
विजय आणि पराभव यांच्यातील अंतर कमी ठेवल्यास लोकशाही मूल्याचे संवर्धन अधिक होते. झालेला निसटता विजय किंवा निसटता पराभव यातून मतदार आणि मतांच्या प्रती लोकप्रतिनिधींकडून आस्था आणि आदर वाढीस लागतो. एकतर्फी सत्ता किंवा राक्षसी बहुमत कधीही जनतेच्या हिताचे नसते. त्यातून एकाधिकारशाही आणि मनमानी रुजण्याचा धोका अधिक संभवतो. याची चांगली जाणीव आणि समज असल्याचे वसईकर मतदारांनी या निवडणुकीत दाखवून दिले आहे. उबाठा सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अप) या दोघांनाही निवडणुकीत भोपळाही फोडता आलेला नाही. शिंदे सेनेची भाजपच्या साथीमुळे 1 जागा पदरी पडून लाज जेमतेम वाचली असली तरी, वसई पूर्वेस असलेल्या त्यांच्या बोईसर आमदाररासाठी ही बाब शरमेची असल्याचे बोलले जात आहे.
भाजप आणि बविआचे अनेक प्रस्थापित उमेदवारांना भरवशाच्या प्रभागातून मतदारांनी घरी बसवले असून, केवळ भावनेवर स्वार होऊन आणि मतदारांना गृहीत धरून निवडणुका लढता येत नाहीत. निवडणूक तोंडावर आयत्यावेळी केलेल्या सोयरीका, तत्वशून्य तडजोडी आणि संकेतद्रोह मतदार खपवून घेत नाहीत, हा संदेशही या निवडणूकातून मिळतो. भाजपच्या प्रभारी पूनम महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन, तसेच पालघर खासदार हेमंत सवरा, नालासोपारा आमदार राजन नाईक आणि वसई आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वात भाजपने निवडणूक रणनीती आखली. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रचारसभा नालासोपारा येथे झाली. प्रमुख भाजप नेते प्रचारात सामील झाले होते. तर बविआसाठी हितेंद्र ठाकूर हेच एकमेव स्टार प्रचारक होते. त्यांनी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई बनवून निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर लढली आणि मोठे आव्हान परतवून अखेर गड राखला.
आता निवडणुका संपलेल्या आहेत. सुडाचे राजकारण आणि व्यक्तिगत इगो दूर ठेवून, वसईच्या समतोल विकासासाठी उभयपक्षी नेत्यांनी येथील जनतेच्या मूलभूत गरजा, सोई-सुविधा आणि विकासाच्या मुद्द्यावर समन्वयाचे समाजकारण करण्याची आवश्यकता आहे.