Palghar Tourism Development: पालघरच्या पर्यटनाला नवी दिशा; डहाणू, केळवे आणि दाभोसा धबधब्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर
पालघर : हनिफ शेख
पालघर जिल्ह्याची मुख्य ओळख हे येथील बहरलेले पर्यटन हे आहे. अगदी नैसर्गिक रित्या तयार झालेल्या या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी शासनाकडून आजवर अनेक योजना मंजूर झाल्या आहेत. खरंतर या भागात अधिकचा निधी देऊन विशेष अशी कामे करणे गरजेचे होते. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पर्यटन विकास हा या जिल्ह्याच्या विकासाचा मुख्य गाभा असल्याची ओळखून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ इंदू राणी जाखड यांनी आता पर्यटनासाठी विशेष निधी मंजूर केला आहे. यावेळी डहाणू बीचसाठी चार कोटी तर केळवे या ठिकाणी तीन कोटी आणि विशेष म्हणजे जव्हार येथील दाभोसा या ठिकाणी धबधबा जवळून अनुभवण्यासाठी स्कायवॉक आणि उद्यानासाठी तब्बल 2 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून येथील पर्यटनासाठी शाश्वत विकासाच्या योजना असाव्यात अशी अपेक्षा येथील नागरिकांकडून व्यक्त होत होती त्या आता कुठेतरी पूर्ण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आज पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर, मुरबे येथे प्रस्तावित बंदर, बुलेट ट्रेन असे अनेक मोठे प्रकल्प येत आहेत. याला मोठ्या प्रमाणावर स्थानिकांचा विरोध देखील होत आहे. मात्र दुसरीकडे पालघर जिल्ह्याला लाभलेला समुद्रकिनारा आणि जिल्ह्यातील ग्रामीण भाग म्हणजेच जव्हार,मोखाडा, विक्रमगड या भागात निसर्गाने भरभरून दिलेली अनेक नैसर्गिक पर्यटन स्थळे असे एकूणच चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. यामुळे या जिल्ह्याचा विकास करताना या भागातील पर्यटन स्थळांना विशेष महत्त्व देणे आवश्यक आहे. राज्यातील माथेरान, महाबळेश्वर जवळ असलेला सापुतारा या ठिकाणी आज येथील पर्यटन स्थळांचा विकास पाहता बारमाही पर्यटक या ठिकाणी येतात. आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार या ठिकाणी देऊन जातात याशिवाय स्थानिकांच्या हाताला देखील यामुळे काम मिळते.
असेच नैसर्गिक पर्यटन पालघर जिल्ह्यात देखील आहे. मात्र याला बारमाही पर्यटकांची पसंती राहत नाही कारण की पावसाळ्यात वाहणारे धबधबे हिवाळ्यातच कोरडे पडतात. याशिवाय या पर्यटन स्थळांना पोहोचण्यासाठी अनेक अडथळे देखील आहेत. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर देखील त्या पर्यटन स्थळांचा आनंद घेण्यासाठी अनेक सुविधा दिसून येतात यामुळे येथील पर्यटन स्थळांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना सर्व सुख सुविधा या मिळणे आवश्यक आहे. असे असताना आजवर या पर्यटन स्थळांच्या नावाने कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र यामधून सिमेंट काँक्रीट ची जंगलेच निर्माण करण्यावर अधिकारी आणि ठेकेदारांनी भर दिल्याचे दिसून आले.
यामुळे यानंतर येथील पर्यटन स्थळावर शाश्वत विकास होण्यासाठी या पर्यटन स्थळांचा अभ्यास करून येथे नेमके कशाची आवश्यकता आहे तीच कामे होणे गरजेचे आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जाखड यांनी विशेष लक्ष दिल्याचे आता दिसून येत आहे. कारण की जव्हार तालुक्यातील दाभसा धबधबा हा अतिशय प्रसिद्ध असा धबधबा आहे. मात्र येथे काही अपघाती घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी जाण्यास बंदी करण्यात आली. आणि यामुळे येथील पर्यटक देखील घटले. एवढेच नाही तर अगदी कमी जागेत उभे राहून हा धबधबा फक्त लांबून बघण्याशिवाय विशेष या ठिकाणी काहीही नसल्याने येथे पर्यटकांची गर्दी आता कमी होत आहे. मात्र आता धबधबा अगदी जवळून बघता यावा यासाठी या ठिकाणी स्कायवॉक तयार होणार आहे. याशिवाय मोठे उद्यान देखील या ठिकाणी बनविण्यात येणार आहे. जेणेकरून लहान मुले वयस्कर मंडळी या निसर्ग संपन्न अशा वातावरणातील या उद्यानाचा आनंद घेऊ शकतील आणि ज्यांना धबधब्यांबद्दल आकर्षण आहे. त्यांना अगदी जवळून या धबधब्याचा देखील आनंद घेता येईल.
उद्यान,स्कायवॉक ,बीचेस होणार आकर्षक
यासाठी तब्बल दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले असून याची प्रशासकीय मान्यता देखील झाली असल्याने लवकरच हे उद्यान आणि स्कायवाक येथे उभारले जाणार आहे. तर नुकतेच डहाणू येथे झालेल्या मॅरेथॉन नंतर या समुद्रकिनारी अधिकच्या सुविधा आणि कामे होण्यासाठी तब्बल 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत तर पालघर शहराला लागून असलेल्या केळवे बीचवर देखील 4 कोटींची विकास कामे करण्यात येणार आहेत.

