

वसई समुद्र किनाऱ्यापासून साधारणपणे ६६ नॉटिकल मैल (सुमारे १२२ किमी) अंतरावर खोल समुद्रात एका ठिकाणी एक पाण्यात एक गूढं रिंगण आढळले आहे. या रिंगणामध्ये पाणी अत्यंत वेगाने फिरत असून मध्यभागातून मातकट किंवा तपकिरी रंगाचे पाणी बाहेर येत असल्याचे मच्छीमारांनी पाहिले. वसईतील पाचूबंदर येथील एक बोट मासे पकडण्यासाठी समुद्रात गेली होती ती परतत असतातान या बोटीवरील खलाशांना हे गूढं रिंगण दिसले. त्यांनी त्याचा व्हिडीओ काढला. वसईपासून समुद्रात ६६ नॉटिकल मैल आत हे ठिकाण गुजरातच्या राजकोट किनारपट्टीच्या दिशेला असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रथम ज्या बोटीने हे रिंगण पाहिले त्यावेळी ती बोट या चक्राकार प्रवाहाच्या अगदी जवळ पोहोचली होती. सुदैवाने मच्छीमारांनी प्रसंगावधान राखून बोट वेळीच मागे फिरवली, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. या घटनेचा व्हिडिओ मच्छीमारांनी शूट केला असून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
ज्वालामुखीची हालचाल?
या 'पाण्याच्या रिंगणा'चे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु तज्ज्ञ आणि मच्छीमार यांच्या मते रिंगणाच्या मध्यभागातून बाहेर येणाऱ्या मातकट पाण्यामुळे समुद्राच्या तळाशी ज्वालामुखीची हालचाल सुरू असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या परिसरात 'ओएनजीसी'च्या (ONGC) तेल आणि गॅसवाहिन्या आहेत. एखाद्या वाहिनीला मोठी गळती लागल्यामुळे असा दाब निर्माण होऊन पाणी चक्राकार फिरत असावे, अशीही एक शक्यता आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाने या घटनेची माहिती भारतीय तटरक्षक दल व नौदलाला (Navy) दिली असून हे रिंगण नेमके कशामुळे तयार झाले आहे, हे स्पष्ट होईपर्यंत मच्छीमारांना त्या परिसरात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक मच्छीमार सध्या खोल समुद्रात जाण्यास घाबरत आहेत.