

Palghar Farmers Protest
तलासरी : मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी तलासरी तालुक्यातील सूत्रकार लाखनपाडा परिसरातील 20 हून अधिक वनपट्टा धारक शेतकर्यांना तीन वर्षांनंतरही मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त शेतकर्यांनी अखेर एकत्र येत आंदोलनाचे हत्यार उपसले असून, आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
या आंदोलनादरम्यान शेतकर्यांनी आरोप केला की, वडिलोपार्जित जमिनीत आंबा, चिकू, चिंच, काजू, खजुरी आणि इतर जगली यांसारख्या शेकडो झाडांची लागवड करण्यात आली होती. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा मोबदला न देता संबंधित ठेकेदार कंपनीने मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले. परिणामी अनेक शेतकरी उदरनिर्वाहाच्या प्रमुख साधनापासून वंचित झाले आहेत.
याबाबत गेल्या तीन वर्षांपासून प्रशासनाकडे न्यायासाठी खेटे घालीत आहे. शेतकर्यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, तसेच महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. यादरम्यान तीन प्रांताधिकारी बदलले, परंतु अद्याप एकाही शेतकर्याला मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे या शेतकर्यांच्या संयमाचा अंत झाला असून, त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
पालघर जिल्ह्यातील अनेक आदिवासी शेतकर्यांची वनपट्ट्याची जमीन या महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. परंतु वनहक्क कायद्यानुसार घोषित करण्यात आलेल्या जमिनींवर मालकी असलेल्या शेतकर्यांना आजही मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे या शेतकर्यांवर भूमिहीन होण्याची वेळ आली आहे.
आंदोलनादरम्यान शेतकर्यांनी ठेकेदार आणि प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत शेतकर्यांनी आरोप केला की, ठेकेदार कंपनी आणि प्रशासनाने सुरुवातीस गोड बोलून आश्वासन देत काम सुरु राहू दया तुमच्या मोबदल्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र प्रत्यक्षात काम पूर्ण झाल्यावर शेतकर्यांना धुडकावून लावले जात आहे. त्यांच्या मते, महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदार कंपन्यांकडून फसवणूक झाल्याची भावना झाली आहे. शेतकर्यांनी आमदार, खासदार यांच्याकडेही पत्रव्यवहार केला. मात्र कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच मोठे आंदोलन करण्यात येणार असून शेतकर्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
वडिलोपार्जित जमिनींचा तातडीने मोबदला द्यावा.
झाडांची किमत आणि नुकसानभरपाई द्यावी.
झोपड्यांचे पुनर्वसन करावे.
भूमिहीन होणार्या कुटुंबांना पर्यायी जमीन द्यावी.
आमची सहा गुंठे वडिलोपार्जित जमीन आणि वनपट्टाची तीन एकर जमीन होती. त्यात आंबा, चिंच, खजुरी अशी झाडं लावली होती आणि शेतीही चालू होती. आमचं संपूर्ण आयुष्य या जमिनीवर अवलंबून होत. मात्र मोबदला न देता सगळंच उध्वस्त केलं. त्यामुळे आमच्या कुटुंबाचे सर्व काही उध्वस्त झाले आहे.
नितेश रावजी भेलका, बाधित शेतकरी.
आम्ही मागील अनेक वर्षांपासून वनपट्ट्यावर कसून शेती केली आहे. सरकार आणि ठेकेदारांनी मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते. आता काम झाल्यावर आम्हाला धुडकावले जात आहे. आमचा परिवार रस्त्यावर आले आहे. आम्हाला न्याय द्या नाहीतर आम्ही आत्मदहन करू.
आनंदी गोंड, बाधित शेतकरी महिला.