

Maharashtra Farmer Scheme
सोलापूर : राज्यातील कृषी विभागाच्या वतीने शेतकर्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लाभ दिला जातो. याअंतर्गत यंदाच्या वर्षी राज्यातील एक लाख 52 हजार 143 शेतकर्यांना 840 कोटी रुपयांचे वाटप डीबीटीच्या माध्यमातून केले जाणार आहे.
कृषी विभागाच्या वतीने वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. त्यामध्ये प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य या तत्वाचा वापर केला जातो. या माध्यमातून अर्ज केलेल्या लाभार्थी शेतकर्यांची यादी नुकतीच कृषी विभागाने प्रसिद्ध केली आहे. यंदाच्या खरीप हंगामामध्ये या कृषी उपयोगी साधनांचा फायदा या लाभार्थी शेतकर्यांना होणार आहे. ज्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे, त्यांना कृषी विभागामार्फत लाभार्थ्यांच्या मोबाईलवर एसएमएस पाठविण्यात आले आहेत.
याशिवाय निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी डीबीटी पोर्टल, कृषी विभागाचे संकेतस्थळ, कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकार्यांच्या लॉगिनवर उपलब्ध करुन दिली आहे. या माध्यमातून ज्या शेतकर्यांची निवड झाली आहे, त्या शेतकर्यांनी येत्या 10 दिवसांमध्ये आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर संबंधित शेतकर्यांना लगेचच पूर्वसंमती मिळणार आहे. या सगळ्यांसाठी शेतकर्यांनी फार्मर आयडी काढणे गरजेचे आहे. ज्या शेतकर्यांनी अद्यापही फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तो काढून घेणे गरजेचे आहे. येत्या 10 दिवसांमध्ये पात्र लाभार्थी शेतकर्यांकडून कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास त्यांचा अर्ज आपोआप रद्द होणार असल्याचेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेणार्या शेतकर्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकर्यांनी बाजी मारली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सर्वाधिक 11 हजार 686 तर त्याखालोखाल अहिल्यानगरमधील 11 हजार 182 शेतकर्यांचा या निवड यादीमध्ये समावेश आहे. तर राज्यात सर्वात कमी म्हणजे ठाणे जिल्ह्यातील केवळ 495 शेतकर्यांची निवड झाली आहे.