

MahaBeej QR code
मुंबई : राज्यात खरीप हंगामासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीज अडीच लाख किंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करणार आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या साथी पोर्टलच्या माध्यमातून क्यूआर कोडसह या बियाण्यांचा प्रवठा केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. अनुदानित दरात हे बियाणे उपलब्ध होणार असून योजनेचा लाभमिळण्याकरिता शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन महाबीजने केले आहे.
येत्या खरीप हंगामात महाबीजचे सर्व प्रमाणित बियाणे हे साथी पोर्टल मधून नोंदणी केलेले असणार आहे व बियाण्याच्या प्रत्येक बॅगवर साथी पोर्टलचा क्यूआर कोड असणार आहे.
हा कोड स्कॅन केल्यावर या बियाण्यासाठी वापरलेला स्रोत बियाणे कुठून मिळाले, या बियाण्याचे उत्पादन व प्रक्रिया कुठे झाली, बियाण्याच्या तपासणीचे लॅब रिपोर्ट अशी इत्थंभूत माहिती उपलब्ध होणार आहे. म्हणजेच हे बियाणे १०० टक्के शुद्ध असल्याची एक प्रकारे खात्रीच शेतकऱ्यांना मिळणार आहे.
राज्यस्तरीय खरीप २०२५ हंगामपूर्व बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बियाणे शोध क्षमतेकरिता केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या साथी पोर्टलचे महत्त्व अधोरेखित केले असून त्याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल, असे सांगितले आहे. यंदा मान्सून लवकर येण्याची चिन्हे असल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन महाबीजने बियाणे पुरवठ्याचे कार्य सुरू झाले आहे. काही वाणांच्या बियाण्यांची अतिरिक्त मागणी झाल्यास उपलब्ध करून देण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. यंदा ७१ हजार क्विंटल बियाणे विद्यापीठांनी नव्याने संशोधित केलेल्या वाणांचे असणार आहे.
तूर: रु. १३०, मूग : रु. १४०, उडीद रु. १३५, भात : रु. ३०-४० (वाणानुसार), संकरित बाजरी : रु. १५०, सुधारित बाजरी: रु. ७०, नाचणी: रु. १००.