

Palghar Panchayat Samiti Fire Incident
पालघर : पंचायत समिती कार्यालयाच्या पहिल्या माळ्यावर असलेल्या महिला बाल विकास विभागाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला अचानक आग लागली. या आगीत कार्यालय भस्मसात झाले. आज (दि.२१) सकाळी दहाच्या सुमारास ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सकाळी कार्यालयीन वेळ असली तरी अधिकारी कर्मचारी कार्यालयात नसल्यामुळे जीवितहानीचा अनर्थ टळला. मात्र, कार्यालयातील टेबल, खुर्च्या, संगणक, शासकीय अभिलेख असे साहित्य व दस्तावेज आगीच्या भक्षस्थानी पडले. सुरुवातीला अग्नीरोधक यंत्रणेने कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही.
दरम्यान, पालघरच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले . पालघरच्या अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. तोवर अंगणवाडी सेविका मदतनीस पदाच्या नवीन भरतीच्या फाइली तसेच जुने अभिलेख पूर्णपणे जळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.