

पालघर : पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी निवडून आलेले उत्तम घरत यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्या नंतर नगर परिषद मुख्यालय परिसरात शिवसैनिकांनी फाटाक्यांची अतिषबाजी केली. निवडून आल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात केली आहे. परंतु पालघर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याच्या कामाला प्राध्यान्य देणार असल्याचे उत्तम घरत यांनी सांगितले.
नगराध्यक्ष पदाच्या पदग्रहणाच्या नियोजित कार्यक्रमासाठी सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पालघर शहरातील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक,पदाधिकारी आणि शिवसैनिक एकत्र आले होते.दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास उत्तम घरत आणि जिल्हा प्रमुख कुंदन मिरवणूकीने नगरपरिषद कार्यालयात पोहोचले.शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित आणि जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी उत्तम घरत यांना नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीत बसवून पदभार स्वीकारण्याची औपचारिकता पूर्ण केली.यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि उत्तम घरत यांच्या समर्थककांनी नगरपरिषद मुख्यालय परिसरात मोठी गर्दी केली होती. पदग्रहण सोहळ्याला शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित, जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक, माजी नगरसेवक,विविध पदाधिकारी आणि मोठया संखेने शिवसैनिक उपस्थित होते.
मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष उत्तम घरत यांच्या हस्ते केक कापण्यात आला.फटाक्यांची अतिषबाजी करीत मोठा जल्लोष करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आशिर्वाद,शिवसैनिकांची मेहनत आणि पालघरच्या जनतेने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.निवडून आल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात केली आहे.परंतु शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याच्या कामाला प्राध्यान्य देणार असल्याचे सांगितले.शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचा विश्वास उत्तम घरत यांनी व्यक्त केला. शहराचा झपाट्याने विकास होत आहे.पालघर शहराच्या सुनियोजीत विकासासाठी आमदार म्हणून नगराध्यक्षांना सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार राजेंद्र गावित यांनी दिले.
डहाणू : डहाणू नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून राजेंद्र माच्छी यांनी सोमवारी अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. त्यामुळे डहाणू नगरपरिषदेला पुन्हा एकदा जनतेतून थेट निवडून आलेले नेतृत्व मिळाले आहे. यावेळी पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित, शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे, माजी आमदार आनंद ठाकूर, नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी सांगितले की, राजेंद्र माच्छी हे जनतेतून थेट निवडून आलेले नगराध्यक्ष आहेत. डहाणूत अहंकाराचे राजकारण बाजूला ठेवून सत्ताबदल झाला असून, आता सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल.तसेच डहाणूचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नवे नेतृत्व प्रामाणिकपणे काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डहाणू नगरपरिषदेची मागील सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर 2017 मध्ये झाली होती. 17 डिसेंबर 2017 रोजी मतदान झाले, तर 18 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होऊन नगराध्यक्ष व नगरसेवक थेट जनतेतून निवडून आले होते. त्यानंतर 23 डिसेंबर 2017 रोजी नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला होता. या नगरपरिषदेचा कालावधी 11 जानेवारी 2023 रोजी संपला. त्यानंतर झालेल्या नव्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर झाला. निकालानंतर राजेंद्र माच्छी यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आणि त्यांनी 5 जानेवारी 2026 रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारला.