

रेमंड मच्याडो
पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील उपलाट धोधडपाडा या आदिवासी भागात, ख्रिस्तराय आदिवासी विद्यामंदिर शाळेच्या नूतन इमारतीचा शनिवार 3 जानेवारी रोजी, मुंबई जेज्विट प्रॉव्हिन्सचे प्रोव्हीन्सीयल मा. फादर ओनिल परेरा यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी पालघर जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. आनिल झिरबा साहेब यांनी भूषविले. तसेच प्रमुख पाहुणे विल्यम अँथनी तुस्कानो आणि जॉना विल्यम तुस्कानो हे होते.
नुकत्याच उभारलेल्या शाळेसाठी भरीव देणगी देणारे विल्यम अँथनी तुस्कानो हे केवळ उद्योजकच नाहीत, तर एक संवेदनशील समाजसेवक म्हणूनही ओळखले जातात. शिक्षण, आरोग्य आणि वृद्धांची सेवा या क्षेत्रांत त्यांनी दिलेल्या योगदानामुळे ते आज महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात एक आदर्श ठरले आहेत.
विल्यम यांचा जन्म गांधी जयंतीच्या दिवशी 2 ऑक्टोबर 1963 रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण नंदाखाल येथील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये झाले. एस.एस.सी. नंतर त्यांनी वांद्रे येथील फादर आग्नेलो पॉलिटेक्निकमधून प्रॉडक्शन इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केला आणि त्यानंतर त्यांनी पिता स्व. अँथनी लॉरेन्स तुस्कानो यांनी स्थापन केलेल्या ‘गार्डवेल इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेड या आस्थापनेत आपली व्यावसायिक कारकीर्द सुरू केली.
विल्यम अँथनी तुस्कानो यांचे वैवाहिक जीवनही तितकेच लक्षवेधी आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा बाबरी मशीद पाडली गेली. या ऐतिहासिक दिवशी त्यांचा विवाह आगाशी मेरभाट येथील अंतोन मेनेझेस यांची ज्येष्ठ कन्या जॉना यांच्याशी झाला. सौ. जॉना या स्वतः एक शिक्षणतज्ज्ञ असून, सत्पाळा येथील सेंट जोसेफ सिनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली असून, सध्या त्या गार्डवेल कंपनीच्या संचालक म्हणून कार्यरत आहेत. या दाम्पत्याला दोन कन्यारत्न आहेत. त्यांची ज्येष्ठ कन्या कु. विलोना तुस्कानो या सध्या गार्डवेल इंडस्ट्रीजच्या प्रशासन प्रमुख आहेत. पारंपरिक कौटुंबिक व्यवसायाला आधुनिक कॉर्पोरेट स्वरूप देण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. व्यवस्थापनातील पारदर्शकता, कर्मचारी-केंद्रित दृष्टिकोन आणि व्यावसायिकता यामुळे गार्डवेलमध्ये संस्थात्मक बदल घडून आले आहेत. त्यांच्या
नेतृत्वाखाली कंपनीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ग्राहकांमध्ये विश्वासार्हता मिळवली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत मुंबईच्या एक प्रतिष्ठित न्यूज चॅनलतर्फे त्यांना 15 ऑगस्ट 2025 रोजी ‘युथ आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
असलेले आपले पिता अँथनी लॉरेन्स तुस्कानो यांच्या पावलावर पाऊल टाकत, विल्यम अँथनी तुस्कानो यांचेही सामाजिक योगदान हे फक्त एकदाच नव्हे, तर सातत्यपूर्ण आहे. गार्डवेल कंपनीच्या माध्यमातून त्यांनी अनेक शाळा, महाविद्यालये आणि वृद्धाश्रमांना आर्थिक मदत केली आहे. त्यांची ही दानशूर वृत्ती केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून, ती एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी स्वीकारलेली आहे. मा. विल्यम अँथनी तुस्कानो यांना महाराष्ट्र राज्य मराठी वृत्तपत्र लेखक संघातर्फे, संस्थेच्या 24 व्या वर्धापन दिनी पद्मभूषण मा. रामभाऊ नाईक, माजी राज्यपाल तथा माजी केंद्रीय रेल्वे मंत्री, यांच्या शुभहस्ते ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
तलासरीसारख्या दुर्गम आदिवासी भागात शिक्षणाच्या संधी निर्माण करणे, हा केवळ एक प्रकल्प नसून, एका पिढीच्या भविष्याला आकार देण्याचे सत्कार्य आहे. विल्यम अँथनी तुस्कानो यांची ही देणगी म्हणजे त्या भागातील मुलांसाठी उज्ज्वल भविष्याची पहाट आहे.
आजच्या आपल्या समाजात अशा व्यक्तींची गरज आहे की जे आपल्या यशाचा वाटा समाजाशी शेअर करतात आणि ज्यांच्या कृतीतून माणुसकीचा खरा अर्थ प्रकट होतो. माननीय विल्यम अँथनी तुस्कानो हे अशाच समाजसेवकांचे सर्वोत्तम प्रेरणादायी उदाहरण आहेत.
वसई तालुक्यातील नंदाखाल येथील ॲन्थोनी तुस्कानो यांनी 35 वर्षांपूर्वी सुरू केलेला ‘गार्डवेल उद्योग’ आज देशभर स्टील फर्निचर निर्मितीमध्ये एक अग्रगण्य नाव बनले आहे. बँकेतील तिजोऱ्या, ऑफिस फायलिंग सिस्टम आणि अन्य स्टील उत्पादने निर्मिती करणाऱ्या या उद्योगाने स्टीलएज आणि गोदरेजसारख्या दिग्गज कंपन्यांना मोठी स्पर्धा निर्माण केली आहे. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या आणि अपार कष्टाने जीवनात यश संपादन केलेल्या ॲन्थोनी तुस्कानो यांची समाजसेवेची जाणीव अतिशय प्रगल्भ होती. गरिबांप्रती असलेल्या त्यांच्या उदार दृष्टीकोनामुळे तलासरी तालुक्यात अनेक लोकोपयोगी प्रकल्पांना त्यांनी दिलखुलास आर्थिक मदत केली. मात्र, 10 डिसेंबर 2015 रोजी वयाच्या 78 व्या वर्षी त्यांचे अचानक निधन झाले.
त्यांच्या जाण्याने समाजाने एक महान दातृत्वशील व्यक्तिमत्त्व गमावले. स्वर्गवासी ॲन्थोनी तुस्कानो यांचे सुपुत्र आणि गार्डवेल इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक विल्यम ॲन्थोनी तुस्कानो यांनी आपल्या वडिलांच्या धर्मादाय वृत्तीला पुढे नेत, समाजसेवेचा वारसा जपण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. याच परंपरेतून त्यांनी पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील ज्ञानमाता सदन तलासरी मिशनच्या शताब्दी वर्षानिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 50 लाख रुपयांची भरघोस देणगी प्रदान केली आहे. ही देणगी ख्रिस्तराय आदिवासी विद्यामंदिर उपलाट धोधडपाडा आणि निर्मला आदिवासी विद्यामंदिर सावरोली, पाटीलपाडा या शाळांच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी दिली आहे. या शाळांमध्ये 374 व 380 गरीब आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांचे पालक प्रामुख्याने शेतकरी व शेतमजूर आहेत. या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, शिक्षणाचा दर्जा उंचवावा यासाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे.